आरोग्यदायी मुळा, जाणून घ्या त्याचे फायदे | पुढारी

आरोग्यदायी मुळा, जाणून घ्या त्याचे फायदे

नवी दिल्ली : पराठे बनवण्यापासून सॅलड प्लेटस् सजवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी मुळा वापरला जातो. केवळ चवीसाठी म्हणूनच नव्हे, तर आरोग्यासाठीही मुळा बहुपयोगी आहे. मुळ्यामध्ये कॅटेचिन, पायरोगॉलॉल, व्हॅनिलिक अ‍ॅसिड आणि फिनोलिक संयुगे यासारखे अँटिऑक्सिडंटस् असतात. मुळ्याच्या नियमित सेवनाने व्यक्तीच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मुळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारून पित्तनिर्मिती नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जे अ‍ॅसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम देते. मुळ्यामध्ये पोटॅशियमचे चांगले प्रमाण रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. मुळा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. मुळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. केस व त्वचेच्या आरोग्यासाठीही मुळा गुणकारी आहे.

मुळ्यामधील फायबरचे प्रमाण इन्सुलिन नियंत्रित करण्यास मदत करू शकते. मुळ्यामध्ये असलेले कंजेस्टिव्ह गुणधर्म खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. मुळ्यामध्ये मूत्रवर्धक गुणधर्म आढळतात जे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असतात. हे शरीरातील विषारी घटक काढून टाकून नैसर्गिक शुद्धीकरणाचे काम करते. मुळ्यामध्ये अँथोसायनिन्स नावाचे फ्लेव्होनॉईडस्चे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. तसेच हृदयाच्या आरोग्याचा धोका कमी करून कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Back to top button