200 फूट उंच टॉवरची चोरी! | पुढारी

200 फूट उंच टॉवरची चोरी!

न्यूयॉर्क : जगभरात चोरीच्या घटनांमध्ये आता काहीही नावीण्य राहिलेले नाही. कुठे दागिन्यांची चोरी, कुठे रोख रकमेची चोरी तर कुठे दस्तऐवजांची, कागदपत्रांची तर काही चीजवस्तूंची चोरी. कित्येकदा वाहनांची चोरी. हे सर्वश्रुतच आहे. पण, अमेरिकेत एक चोरी अशीही झाली, ज्यामुळे चक्क पोलिसही चक्रावले.

याप्रकरणी अमेरिकन पोलिस अधिक तपास करत आहेत. पण, अद्याप काहीही थांगपत्ता लागलेला नाही. आता ही चोरी छोटी अजिबात नाही. कारण, येथे चोरट्यांनी दागिने, रोख रक्कम, वाहने यावर नव्हे तर एका चक्क 200 फुटांच्या टॉवरवर अनोखा डल्ला मारला आहे.

अमेरिकेच्या अलाबामा राज्यात जॅसपर नावाचे शहर आहे. या शहरात डब्ल्यूजेएक्स हे एक रेडिओ स्टेशन आहे. या रेडिओ स्टेशनच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. स्टेशनचे प्रमुख ब्रेट एलमोर यांनी लिहिले आहे की, त्यांच्या रेडिओ स्टेशनच्या आवारात चोरी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते; पण त्यांना असे वाटले नव्हते की, चोर कोणत्याही गोष्टीची चोरी करतील. या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, सकाळी त्यांच्या रेडिओ स्टेशनचे कर्मचारी टॉवरच्या परिसरात स्वच्छता करण्यासाठी गेले होते. पण, त्यावेळी त्यांना टॉवर जागेवर नसल्याचे पहात मोठा धक्का बसला. ब्रेट यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, इतर सर्व साहित्य अस्ताव्यस्त टाकून चोर अक्षरशः इथला संपूर्ण टॉवरच उपटून घेऊन पसार झाले आहेत. टॉवर चोरी होणे, या गोष्टीवर विश्वास ठेवणे कसे कठीण असू शकते, याचा यावेळी प्रशासनाने आणि पोलिसांनीही अनुभव घेतला.

चोरांनी फक्त टॉवरच नाही तर ट्रान्समीटरसुद्धा चोरला. या दोन्हीची किंमत, ते बसवण्याचा खर्च आणि अन्य साहित्याचा खर्च मिळून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च असू शकतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पोलिसांचे पथक आता तपास करत असून, यादरम्यान गो फंड मी कॅम्पेन सुरू केले गेले आहे. टॉवर पुन्हा उभा करण्यासाठी या माध्यमातून ते पुन्हा निधी जमा करत आहेत.

Back to top button