नाशिक : वादळी वार्‍याच्या पावसात मदतीसाठी गेलेल्या मुलावर काळाचा घाला | पुढारी

नाशिक : वादळी वार्‍याच्या पावसात मदतीसाठी गेलेल्या मुलावर काळाचा घाला

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील देवळाणे येथे रविवारी (दि. 4) वीज कोसळून पवन रामा सोनवणे (13) या बालकाचा मृत्यू झाला, तर गंगाराम सखाराम मोरे (35) हे जखमी झाले. कांदाचाळीतील कांदा मालवाहू रिक्षात भरत असताना ही दुर्दैवी घटना घडली. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देवळाणे येथील गंगाराम सखाराम मोरे या शेतकर्‍याच्या गावाजवळील कांदाचाळीतील कांदा विक्रीसाठी गावातीलच मालवाहू रिक्षात भरला जात होता. याचवेळी तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वार्‍याने हजेरी लावली. यावेळी विजांचा कडकडाट सुरू होता. पावसापासून कांदा भिजू नये यासाठी रिक्षावर प्लास्टिक कागद बांधत असतानाच अचानक वीज कोसळली आणि यात पवन रामा सोनवणे याचा मृत्यू झाला. शेजारीच असलेले चाळमालक गंगाराम सखाराम मोरे हेही वीज पडल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर सटाणा ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. पवनचे वडील मालवाहू रिक्षा चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. सातवीत शिकणारा पवन सुट्या असल्याने त्यांच्या मदतीसाठी आला होता. परंतु, बापाच्या डोळ्यासमोर पवनवर काळाचा घाला आल्याने याबाबत हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात वडील, आई व एक भाऊ असा परिवार आहे. सायंकाळी देवळाणे येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा:

Back to top button