लोणी : खंडकरी शेतकर्‍यांच्या जमिनीबाबत निर्णय घेणार : महसूलमंत्री विखे पाटील | पुढारी

लोणी : खंडकरी शेतकर्‍यांच्या जमिनीबाबत निर्णय घेणार : महसूलमंत्री विखे पाटील

लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : खंडकरी शेतकर्‍यांना वाटप केलेल्या जमिनी विनामोबदला भोगवटा वर्ग 1 करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचे सुतोवाच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले.
शासन आपल्या दारी उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पा. यांनी पुणतांबा-गोंडेगाव येथे नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी नागरिकांनी दिलेल्या निवेदनाबाबत अधिकार्‍यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या त्यांनी सूचना केल्या.

मंत्री विखे पा. म्हणाले, राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्याने जनतेच्या हिताचे निर्णय होत आहेत, मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, या उद्देशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. खंडकरी शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदना संदर्भात बोलताना जमिनीबाबत शासन स्तरावर लवकरच धोरणात्मक निर्णय होणार आहे. वेगवेगळ्या कारणासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी घेतल्या गेल्या. यासाठी मोठा संघर्ष झाला. पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पा. यांनी सुप्रिम कोर्टापर्यत लढाई करून न्याय मिळवून दिला.

आजही कामगारांचे प्रश्न बाकी असले तरी त्यांनाही न्याय देण्याची भूमिका शासन घेणार आहे. मात्र मूळ जमीन मालकांच्या जमिनी भोगवटा वर्ग 1 करताना या शेतकर्‍यांकडून कोणताही मोबदला आकारायचा नाही, ही भूमिका आहे. याबबात शासन स्तरावर लवकरच निर्णय करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वेगवेगळ्या योजनांमधून समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे.

एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ शेतकर्‍यांना घेता येणार आहे. पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच वर्ग होईल. वाळूच्या नव्या धोरणात असलेल्या त्रृटी दूर करून शासन 600 रुपयात वाळू उपलब्ध करून देत आहे. वाळू व्यवसाय माफिया मुक्त होत आहे.

जनतेचे प्रश्न आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमास मिळत असलेला प्रतिसाद पाहाता याची मुदत 31 ऑगस्टपर्यत वाढविण्यात आल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.
यावेळी राहाता, श्रीरामपूर तालुक्यातील अधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

सरकारच्या किसान सन्मान योजनेचा लाभ घ्या!

केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने किसान सन्मान योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे केंद्र व राज्य सरकार मिळून शेतकर्‍याला वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहे. याचबरोबर शेतकर्‍यासाठी 1 रुपयात पिक विमा योजना सुरू केली आहे. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री विखे पा. यांनी केले.

Back to top button