कात्रज : अनधिकृत पार्किंगवर कारवाई; वाहतूक पोलिस ’अ‍ॅक्शन मोड’मध्ये | पुढारी

कात्रज : अनधिकृत पार्किंगवर कारवाई; वाहतूक पोलिस ’अ‍ॅक्शन मोड’मध्ये

कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सातारा रस्त्यावर कात्रज चौक ते गुजरवाडी फाटादरम्यान अनधिकृत पार्किंग केलेल्या 25 वाहनांवर भारती विद्यापीठ वाहतूक विभागाने कारवाई केली. कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिस
‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये दिसत आहेत. मात्र, महापालिकेचा अतिक्रमण निमूर्लन विभाग सुस्त आहे.

कात्रज चौक ते गुजरवाडी फाटादरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ आहे. परिसरात पीएमपीची दोन बसस्थानके आहेत. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा ट्रक, बससह अवजड वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात आहे. त्यातच हातगाडी व पथारी व्यावसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. संबंधित वाहनचालकांना पोलिसांनी सूचना देऊनही या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात असल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे.

ही समस्या सोडविण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे यांच्या सूचनेनुसार पोलिस नाईक संदीप कुडले, महेश पवार यांनी 25 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. कात्रज येथे सातारा रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. वाहनचालकांना वारंवार सूचना देऊनही या रस्त्याच्या कडेला वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, यापुढेदेखील ती सुरूच राहणार आहे.

-प्रशांत कणसे,
सहायक पोलिस निरीक्षक

दरीपुलाजवळील होर्डिंग हटविले

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने बंगळुरू महामार्ग परिसरातील दरीपुलाजवळील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग, बॅनर व फ्लेक्स कारवाई करण्यात आली. महापालिका आकाशचिन्ह विभागाच्या वतीने उपयुक्त जयंत भोसेकर, सहायक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना निरीक्षक नितीन जगदाळे, महेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. उर्वरित अनधिकृत होर्डिंगवरदेखील लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने या वेळी सांगण्यात आले.

Back to top button