पुढारी डेस्क : मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या अनेक भागाला जोरदार तडाखा दिला. काही भागात वीज कोसळली. वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून पडले. झाडे उन्मळून पडल्याने आणि वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत राज्यात सहा जणांचा बळी गेला.
सोलापूर : शहर व जिल्ह्यात रविवारी सायंकाळी साडेचारनंतर काही भागात अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. करमाळा तालुक्यातील गुळसळी येथे वीज कोसळून कमल सुभाष आडसूळ (वय 40) यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सांगोला तालुक्यातील काळूबाळूवाडी येथे शेळ्या चारण्यासाठी शेतात घेऊन गेलेल्या भगवान शामराव व्हनमाने (41) यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
नाते ः किल्ले रायगड परिसरात वादळी वार्यासह झालेल्या तुफान पावसामुळे गडावर जाणार्या मार्गावरील महादरवाजाजवळील मशीद मोर्चा येथे दरड कोसळली. त्यात एका शिवभक्त तरुणाचा मृत्यू झाला. प्रशांत गुंड असे त्याचे नाव आहे. तो मूळचा सोलापूरचा आहे.
सांगली, पलूस, आष्टा परिसराला झोडपले
सांगली : सांगली शहरासह पलूस-आष्टा-कुंडल भागाला आज सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. मान्सूनपूर्व पहिल्या पावसाने तुंबलेले सांगलीतील सार्या मुख्य चौकात, उपनगरात पावसाने दाणादाण उडवली. कुंडल परिसरात आठवडा बाजारात दैना उडाली. पावसाने आष्टा व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला.
नगर : दुपारी वादळी वार्याने तालुक्याच्या पूर्व भागात कल्याण-विशाखापट्टण या राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी (येळी) येथील टोल नाक्याचे पत्राचे शेड जागेवर कोलमडून पडले.
नाशिक : उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार-जळगाव भागात धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्याला सकाळी अकरापासून तासभर अनेक ठिकाणी पावसाचा जोरदार तडाखा बसला. जिल्ह्यात दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू झाला.