रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर सर्विस रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटणार | पुढारी

रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर सर्विस रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटणार

साेलापूर, पुढारी ऑनलाईन :  रत्नागिरी ते नागपूर महामार्गावरील सांगोला तालुक्‍यातील वाटंबरे गावाजवळील सर्विस रोड त्वरित व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. या मागणीची तात्काळ दखल घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी या रस्त्याची स्वतः जाऊन अधिकाऱ्याच्या समवेत पाहणी केली. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना माहिती देण्यात आली होती. याची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दखल घेऊन रविवार 30 जानेवारी रोजी प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, राष्ट्रीय महामार्गाचे महेश यमूल व एम डी जगदाळे, नाईकवाडे यांच्यासोबत वाटंबरे गावात जाऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सर्विस रोड होणे आवश्यक आहे, अश्या जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

तसेच, मंगळवार १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाचे सर्व वरिष्ठ अधिकारी व आमदार शहाजीबापू पाटील व संबंधित प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामुळे वाटंबरे परिसरातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच आमदार शहाजीबापू पाटील यांचे ग्रामस्थांनी आभारही मानले. रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वाटंबरे या गावाच्या मध्यभागातून रस्ता जातो या गावात प्रसिद्ध असे श्री खंडोबा मंदिर आहे. या देवाच्या दर्शनासाठी आसपासच्या गावासह जिल्ह्यातील ही मोठ्या प्रमाणात भाविक येतात यामुळे या ठिकाणी नेहमीच भाविकांची गर्दी असते.

तसेच या गावात शाळा व विद्यालय आहे यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. तसेच दूध उत्पादक शेतकरी व शेतकऱ्यांची मोठी ये-जा असते यामुळे हे गाव प्रसिद्ध आहे. पण रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर सर्विस रोड नसल्याने या गावांमध्ये भाविकांची विद्यार्थ्यांची व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या महामार्गावरील रस्त्याच्या रहदारीमुळे अनेक वेळा छोटे-मोठे अपघात ही घडत आहेत.

या ठिकाणच्या ग्रामस्थांनी या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सर्विस रोड व्हावा अशी ग्रामस्थांसह शेजारच्या गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतक-यांनी मागणी केली होती. शनिवार २९ जानेवारी वाटंबरे येथे जाऊन पाहणी केली व तात्काळ जिल्हाधिकारी शंभरकर यांना लेखी विनंती केली. या विनंतीची जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तात्काळ दखल घेतली आमदार शहाजीबापू पाटील यांना समवेत घेऊन रविवार ३० जानेवारी रोजी वाटंबरे येथे जाऊन राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी सर्विस रोड करावा याची पाहणी केली व या रस्त्याची आवश्‍यकता पाहून तात्काळ महामार्गाच्या अधिकाऱ्यांना मंगळवार १ फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन हा सर्विस रोड पूर्ण करावा असे सांगितले.

या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सर्विस रोड पाहणीच्या वेळी आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार अभिजीत पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता महेश यमुल, एमडी जगदाळे, नाईकवाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हे ही वाचलं का 

Back to top button