करमाळा ; पुढारी वृत्तसेवा : भक्त महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी उंदरगावच्या (ता. करमाळा) मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा याला रविवारी (दि. 19) करमाळा पोलिसांनी अटक केली. सोमवारी करमाळ्याचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी आर. ए. शिवरात्री यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
भोसलेवर बारामती येथे आठ सप्टेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, भोसले याच्यासह तिघा सेवकांनी भक्त महिलेवर बारामती तसेच उंदगाव येथे बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित महिलेने ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे गार्हाणे मांडले होते. याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीनुसार 9 सप्टेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मनोहर भोसलेला ताब्यात घेण्यासाठी बारामती पोलिसांचे दोन व करमाळा पोलिसांचे दोन पथक भोसलेच्या मागावर होते.
परंतु बारामती पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील सालपे (ता. लोणंद) येथील फार्महाऊसवरून त्याला ताब्यात घेऊन अटक केली होती. बारामती न्यायालयाने प्रथम तीन दिवस व नंतर दोन दिवस भोसलेला पोलिस कोठडी दिली होती. रविवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर भोसलेला न्यायालयात हजर केले असता त्याला बारामती येथून आणण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण साने यांच्यासह हवालदार मारूती रणदिवे, संतोष देवकर, चंद्रकांत ढवळे, सिध्देश्वर लोंढे, तौफिक काझी, सोमनाथ जगताप, महिला कॉन्स्टेबल पवार, नागरगोंजे व कांबळे आदी पोलिस कर्मचारी करमाळ्यातून गेले होते.
तेव्हा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून भोसलेला करमाळा पोलिसांनी 19 रोजी ताब्यात घेऊन अटक केली होती.
त्याला आज न्यायालयात केले. यावेळी करमाळा पोलिसांनी 17 विविध कारणांमुळे तपास करणे गरजेचे असल्याने दहा दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. वरीष्ठ पोलिस निरिक्षक सूर्यकांत कोकणे यांनी स्वत: यामध्ये युक्तिवाद केला. तर शासकीय अभियोक्ता अॅड. सचिन लुणावत यांनीही दोन आरोपी अटक करण्याची गरज असुन या गुन्ह्यातील चिठ्ठी रक्कम आदी जप्त करण्यासाठी पोलिस कोठडी मागितली होती.
याला अॅड. हेमंत नरूटे व अॅड.रोहित गायकवाड यांनी हरकत घेऊन मनोहर महाराज यांना बदनाम करणेसाठीच ही खोटी तक्रार असल्याचे मत व्यक्त करून न्यायालयीन कोठडी मागितली होती. तसेच फिर्यादी महिलेकडून एक लाख वीस हजार रुपये उकळून तिच्यावर पाच वेळा अत्याचार केल्याचा मुख्य आरोप या तिघा संशयितावर आहे. पण ही महिला पाच वेळा उदंरगावातील आश्रमात सातारा येथून आल्याने जबरदस्ती व बलत्काराची केलेली तक्रार खोटी असल्याचा युक्तिवाद केला होता.
सुमारे पाऊण तासाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने संशयित आरोपी मनोहर भोसले यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मनोहर भोसले याला करमाळा न्यायालयात आणणार याची माहिती त्याच्या समर्थकांना आधीच मिळाली होती. त्यामुळे भोसले महाराजाच्या समर्थकांनीही न्यायालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. तर या महाराजाला पाहण्यासाठीही अनेकजण तालुक्यातून आले होते. पोलिसांनीही करमाळा न्यायालय परिसर व पोलिस स्टेशन परिसरात कडक बंदोबस्त लावला होता.