पालखी महामार्गाचे शनिवारी भूमिपूजन | पुढारी

पालखी महामार्गाचे शनिवारी भूमिपूजन

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण वारकरी संप्रदायाचे लक्ष लागलेल्या पंढरपूर ते आळंदी या संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी आणि देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन येत्या शनिवारी (दि. 30) पंढरपूर येथे रेल्वे मैदानावर होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संतमंडळींच्या हस्ते या राष्ट्रीय पालखी महामार्गाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत.

आ. प्रशांत परिचारक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत दरवर्षी लाखो भाविक आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या पायी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वारीदरम्यान वारकर्‍यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे.

आ. परिचारक म्हणाले की, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या समन्वयातून हे दोन्ही पालखीमार्ग होत आहेत. या कार्यक्रमास दोन्ही पालखीप्रमुख, मान्यवर मानकरी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या मार्गाचे काम सुरू आहे, पण कोरोना संकटामुळे भूमिपूजन करायचे राहून गेले होते. हा महामार्ग सहापदरी होणार असून पायी चालत वारी करणार्‍या भाविकांची मोठी सोय होणार आहे. साडेदहा हजार कोटी रुपयांचे हे काम प्रगतीपथावर आहे. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गावर 12 पालखीस्थळे, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर 11 पालखीतळ असणार आहेत.

पालखी महामार्गाच्या या भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्यभरातील प्रमुख संतमंडळींना निमंत्रण दिले आहे. त्यांच्या हस्ते पालखीमार्गाचे भूमिपूजन केले जाणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, मंगळवेढा बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, सुभाष मस्के आदी उपस्थित होते.

कार्तिकी यात्रेत संचारबंदी लागू करू नये

ज्यांनी कोरोना लस घेतली आहे अशा भाविकांना कार्तिकी यात्रेसाठी परवानगी द्यावी, शाळा सुरु झाल्या, सर्व व्यवसाय सुरू झाले आहेत, त्यामुळे कार्तिकी यात्रेत संचारबंदी लागू करू नये यासाठी मी व आ. समाधान अवताडे तसेच इतर आमदारांना बरोबर घेऊन लढा देऊ, असे आ. परिचारक यांनी सांगितले.

व्यासपीठावर रंगणार जुगलबंदी

सध्या राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. महाविकास आघाडी सरकारला भाजप विविध कारणांनी कोंडीत पकडत आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंत्र्यांना टार्गेट केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी ऐकावयास मिळणार आहे.

Back to top button