अकोला : RTE ची नोंदणी प्रक्रिया सुरू! शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांची माहिती | पुढारी

अकोला : RTE ची नोंदणी प्रक्रिया सुरू! शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांची माहिती

अकोला, पुढारी ऑनलाईन :  मुलांच्या शिक्षणासाठी (education) शासनाने लागू केलेल्या शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीई (RTE) अंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये शिक्षण संचालनालयाने सुधारणा केल्या आहेत.  निवासी पुराव्यासाठी गॅसबुक, पतसंस्था किंवा स्थानिक बँकेचे पासबुक गृहित धरले जाणार नाही.  तर राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरले जाणार आहे.

1 फेब्रुवारीपासून 2022-23 या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश घेण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी (Education Officer) वैशाली ठग यांनी दिली. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 नुसार राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांमधील 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येतो.

शैक्षणिक सत्र 2022-23 साठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत पालकांना मंगळवार, 1 फेब्रुवारीपासून नोंदणी करावी लागणार आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. प्रवेशाची सोडत 8 व 9 मार्च रोजी होणार आहे. प्रक्रियेदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 10 ते 30 मार्च या कालावधीत संबंधित शाळेकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी व तात्पुरता प्रवेश निश्चित करावी लागणार आहे.  1 एप्रिल ते 9 मे या कालावधीत चार प्रतीक्षा याद्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

नवीन सत्राच्या प्रवेशासाठी निवासी पुरावा म्हणून गॅस बुक यंदा गृहीत धरले जाणार नाही.  तसेच इतर स्थानिक बँका किंवा पतसंस्थेचे पासबुकही गृहित धरले जाणार नाही. निवासी पुरावा म्हणून राष्ट्रीयकृत बँकेचे (Bank) पासबुक आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज, टेलिफोन बील, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून योग्य असतील. भाडे करार हादेखील निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल परंतु हा भाडेकरार दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा व ऑनलाइन अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वीचा असावा तसेच त्याचा कालावधी एक वर्षाचा असणे बंधनकारक आहे. पालकांनी मुलांचे आरटीई अंतर्गत अर्ज सादर करतांना काळजीपूर्वक भरावे असे आवाहनही शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी केले आहे.

हे ही वाचलं का 

Back to top button