अण्णा भाऊ साठे सभागृहाची दयनीय अवस्था; कचरा, राडारोडा, मैलापाण्यासह विविध समस्या | पुढारी

अण्णा भाऊ साठे सभागृहाची दयनीय अवस्था; कचरा, राडारोडा, मैलापाण्यासह विविध समस्या

मिलिंद पानसरे

धायरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथे सभागृह बांधण्यात आले आहे. मात्र, या सभागृहाची सध्या दयनीय अवस्था झाली असून, कचरा, राडारोडा, मैलापाण्यासह विविध समस्यांच्या विळख्यात ते अडकल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. या सभागृहाच्या परिसरात सध्या ठिकठिकाणी कचरा साचला असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे सभागृह मद्यपींचा अड्डा झाला असून, या ठिकाणी दारू व बिअरच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच कचर्‍याच्या ढकलगाड्याही कचर्‍याच्या ढिगात पडल्या आहेत.

सभोवताली संरक्षक भिंतीच्या कडेला झाडे अस्ताव्यस्त उगवली असून, त्याचा पाला-पाचोळा सभागृहाच्या आवारात पसरलेला आहे. सभागृहाच्या आवाराची गेल्या कित्येक महिन्यांपासून साफसफाई करण्यात आली नाही. सभागृहासमोरील प्रांगणात दगड, विटा, मुरमाचे ढीग पडून आहेत. पिण्यासाठी असलेल्या पाण्याच्या नळकोंडाळ्याचीदेखील दुरवस्था झाली आहे. या नळकोंडाळ्याभोवती झाडे, झुडपे वाढली आहेत. छताचा काही भाग कोसळल्याचेही दिसून येत आहे. या सभागृहाजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. या शौचालयाचे संपूर्ण मैला पाणी या सभागृहात आले आहे. त्यामुळे सभागृहाच्या समोरील मोकळ्या जागेत मैला पाण्याचे डबके झाले आहे. याबाबत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप खलाटे यांच्याशी संपर्क साधला असता, ते निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

परिसरातील नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

परिसरात साचलेल्या मैलापाण्याच्या डबक्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, थंडी-ताप, मलेरिया, डेंग्यू आदी साथीचे आजार वाढले आहेत. या सभागृहाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या सभागृहाची सध्या मोठी दुरवस्था झाली असून, महापालिका प्रशासनाने तातडीने परिसराची स्वच्छता करून देखभाल व दुरुस्ती करावी. याबाबत अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या सभागृहाची सर्व कामे लवकर न केल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

– बाप्पूसाहेब पोकळे, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

Back to top button