भंडारा : जंगली पक्ष्यांची शिकार केल्‍याने १४ जणांना अटक | पुढारी

भंडारा : जंगली पक्ष्यांची शिकार केल्‍याने १४ जणांना अटक

भंडारा,पुढारी ऑनलाईन : वीज प्रवाहातून तीन दिवसांपूर्वी झालेल्या व्याघ्र मृत्युची दखल भंडारा वन विभागाकडून घेण्यात आली आहे.  वनविभागाने शिका-यांविरुद्ध चांगलीच कंबर कसली आहे. लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथे जंगली पक्ष्यांची शिकार करणा-या १४ शिका-यांना ३० जानेवारीला रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली.

लाखांदूर येथील वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र दिघोरी, नियतक्षेत्र तिरखुरी अंतर्गत रोहणी या गावालगतच्या शेतशिवारात काही शिकारी जंगली पक्ष्यांची शिकार करण्यासाठी आले हाेते. याबाबतची माहिती लाखांदूर वन विभागाला मिळाली. यांनतर वनविभागाकडून रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शिका-यांनी त्यांच्या दुचाकी रोहणी-पाहुणगाव रस्त्यावर ठेवल्याचे दिसून आले. शिका-यांनी शिकार केल्यानंतर ते परत दुचाकीजवळ आल्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली.

तसेच, या कारवाईमध्ये वन विभागाला १४ शिका-यांना पकडण्यात यश आले आहे. हे सर्व शिकारी धर्मापुरी (टोली) येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील अनुसूची ४ मधील कवड्या (कॉलर डॉव) ४२ जिवंत, ३ मृत, मोठी मैना (सामान्य मैना) २ मृत व लहान मैना (ब्राम्हणी स्टॉलींग) एक मृत हस्तगत करण्यात आले.

तसेच शिकारीकरीता वापरण्यात आलेले सर्व साहित्य, नॉयलन जाळी, तीन बांबू, शिकारीकरीता वापरण्यात आलेले ६ दुचाकी व ५ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावीत, निर्वाण, हात्ते, भजे, ढोले, खंडागळे, पाटील, मेश्राम, प्रफुल राऊत, पोलिस पाटील नंदकिशोर मेश्राम व वनमजूर विकास भूते यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

हे ही वाचलं का  

Back to top button