SRH vs LSG : लखनौने जिंकली लो स्कोअरिंग लढत | पुढारी

SRH vs LSG : लखनौने जिंकली लो स्कोअरिंग लढत

लखनौ; वृत्तसंस्था : के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंटस् संघाने सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या आयपीएल साखळी सामन्यात 5 गडी राखून सहज विजय संपादन केला. हैदराबादला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 121 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले तर प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंटस्ने 16 षटकांत 5 बाद 127 धावांसह सहज आगेकूच केली.

विजयासाठी 122 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना लखनौचा सलामीवीर काईल मेयर्स 13 धावांवर तर तिसर्‍या स्थानावरील दीपक हुडा 7 धावांवर बाद झाले. मात्र, के.एल. राहुलच्या साथीला चौथ्या स्थानी कृणाल पंड्या आला आणि या जोडीने 55 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. कर्णधार के.एल. राहुलने सर्वाधिक 35 तर कृणाल पंड्याने 23 चेंडूंत 34 धावांचे योगदान दिले.

पंड्या तिसर्‍या गड्याच्या रूपाने बाद झाला, त्यावेळी लखनौने 12.2 षटकांत 3 बाद 100 धावांपर्यंत मजल मारली होती. पुढे, 14 धावांच्या अंतराने के.एल. राहुल देखील बाद झाला. पण, तोवर लखनौचा विजय सुनिश्चित झाला होता. रोमारिओ शेफर्ड खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. मात्र, स्टॉयनिस (नाबाद 10) व निकोलस पूरन (नाबाद 11) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. गोलंदाजीच्या आघाडीवर, हैदराबादतर्फे आदिल रशिदने 23 धावांत 2 तर फझल हक फारुकी, उमरान मलिक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

तत्पूर्वी, आघाडी फळीतील एकही फलंदाज क्लिक न झाल्याने सनरायजर्स हैदराबादला 8 बाद 121 धावांवर समाधान मानावे लागले. सलामीवीर अनमोलप्रीत सिंगने 26 चेंडूंत 31 तर राहुल त्रिपाठीने 41 चेंडूंत 34 धावा जमवल्या. मात्र, याचे त्यांना मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही आणि अन्य फलंदाजांत बहुतेकांनी हाराकिरी केली. अब्दुल समदने 21 तर वॉशिंग्टन सुंदरने 16 धावा केल्या. गोलंदाजीच्या आघाडीवर कृणाल पंड्याने 18 धावांत 3 तर अमित मिश्राने 23 धावांत 2 बळी घेतले. यश ठाकूर, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

हेही वाचा; 

Back to top button