MI vs CSK : थाला की हिटमॅन? बाजी कोणाची? | पुढारी

MI vs CSK : थाला की हिटमॅन? बाजी कोणाची?

मुंबई, वृत्तसंस्था : एकापेक्षा एक स्टार खेळाडूंचा समावेश असलेला (MI vs CSK) मुंबई इंडियन्सचा संघ आज महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी रोहित शर्माला फलंदाज या नात्याने त्याचबरोबर कर्णधार या नात्याने एकत्रित प्रयत्न पणाला लावावे लागतील. उभय संघांतील ही लढत आयपीएल ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी हंगामातील पहिल्या सामन्यात आरसीबीविरुद्ध नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागलेल्या मुंबई इंडियन्स संघाला जवळपास आठवडाभराची विश्रांती मिळाली आहे. पण, आज वानखेडे स्टेडियमवर घरच्या चाहत्यांसमोर खेळताना मागील अपयशाची पुरेपूर भरपाई करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

यापूर्वी पहिल्या टप्प्यातील लढतीत विराट कोहलीने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा उत्तम समाचार घेतला होता. पण, राजवर्धन हंगरगेकर व तुषार देशपांडे या दोन्ही अननुभवी गोलंदाजांना कर्णधार धोनीने दिलेला इशारा खूप काही फरक करून जाईल, अशी अपेक्षा आहे. मोईन अली व मिशेल सँटनेर या फिरकीपटूंची कामगिरी कशी होते, यावर देखील चेन्नईचे यशापयश अवलंबून असणार आहे. वाईड यॉर्कर टाकण्यात माहीर असणारा आफ्रिकन सिसांदा मगलाला सँटनेरऐवजी अंतिम एकादशमध्ये संधी मिळण्याची प्रतीक्षा असेल.

मागील काही हंगामात आयपीएलचे व्यासपीठ फारसे गाजवताना दिसून न आलेल्या रोहित शर्मावर यावेळी बराच फोकस असणार आहे. रोहित शर्मा एरवी प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडण्यात माहीर आहे. पण, अलीकडे आयपीएलमध्ये त्याची बॅट म्हणावीशी तळपलेली नाही. येथील छोट्या मैदानावर जोफ्रा आर्चरची गोलंदाजी कशी होईल, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

बुमराह खेळणार नसल्याने त्याची उणीव प्रकर्षाने जाणवू शकते, असे रोहित शर्मा सातत्याने म्हणत आला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज रिले मेरेडिथ हा दुखापतग्रस्त झाय रिचर्डसनऐवजी संघात आला असून संदीप वॉरियरच्या रूपाने आणखी एक पर्याय उपलब्ध असणार आहे.

चेन्नई लाईनअपमध्ये ऋतुराज गायकवाडचा फॉर्म विशेष महत्त्वाचा ठरत आला असून कॉन्वे त्यांचे मुख्य अस्त्र ठरत आले आहे. ऋतुराजने दोन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली असून शिवम दुबे व मोईन अली मधल्या फळीत महत्त्वाचे योगदान देण्याची क्षमता राखून आहेत. अंबाती रायुडू व धोनी फिनिशर म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडू शकतात. गोलंदाजीत दीपक चहरने पुनरागमन केले असून आजवर उभय संघांत झालेल्या 34 सामन्यांत मुंबईने 20 विजय नोंदवले आहेत.

प्रतिस्पर्धी संघ (MI vs CSK)

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, डेव्हाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), ट्रिस्टॅन स्टब्ज, विष्णू विनोद, कॅमेरून ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, शॅम्स मुलाणी, रिले मेरेडिथ, नेहल वधेरा, ऋतिक शौकीन, अर्शद खान, ड्युआन जान्सन, पीयुष चावला, कुमार कार्तिकेय, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडार्फ, आकाश मधवाल.

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), ड्वेन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसांदा मगला, शिवम दुबे, डेव्हॉन प्रिटोरियस, अजय मंडल, निशांत सिंधू, राजवर्धन हंगरगेकर, मिशेल सँटनेर, शुभ्रंशू सेनापती, मथिशा पथिराणा, महेश तिक्ष्णा, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, तुषार देशपांडे.

हेही वाचा…

Back to top button