झुलन गोस्वामी – महिला क्रिकेटची कपिलदेव | पुढारी

झुलन गोस्वामी - महिला क्रिकेटची कपिलदेव

क्रीडाक्षेत्रात कुठल्याही खेळाडूची निव्वळ दोन दशकांतून अधिक चाललेली कारकीर्दच त्या खेळाडूला महान बनवायला पुरेशी असते. त्यातून महिला खेळाडूंच्या आयुष्यात येणारी नैसर्गिक आणि कौटुंबिक स्थित्यंतरे यांचा विचार केला तर दोन दशके मैदान गाजवणार्‍या महिला खेळाडू कंकणभर जास्तच कौतुकास पात्र ठरतात. झुलन गोस्वामी हिने काल आपल्या कारकिर्दीचा अखेरचा सामना लॉर्डस्वर जेव्हा खेळला तेव्हा 20 वर्षे 261 दिवस चाललेल्या या महान कारकिर्दीचा पूर्णविराम होता. 12 कसोटी, 203 एक दिवसीय सामने आणि 68 टी-20 सामने चाललेली ही कारकीर्द म्हणजे भारतीय महिला क्रिकेटचा चालता बोलता इतिहास होता.

1997 चा महिला क्रिकेटच्या विश्वचषकाचे आयोजन भारतात झाले होते. ईडन गार्डन्सला झालेल्या ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंड अंतिम सामन्यात 15 वर्षांची झुलन गोस्वामी सीमारेषेवर चेंडू परत करणार्‍या काही मुलींपैकी एक होती, पण इथूनच तिच्यात क्रिकेटपटू बनायचे बीज रोवले गेले. पश्चिम बंगालमधल्या चकदा नावाच्या छोट्या गावातील झुलनला क्रिकेटपटू बनायचे असले तरी ते इतके सोपे नव्हते. तिच्या गावापासून जवळात जवळ महिला क्रिकेट प्रशिक्षण घ्यायची सोय 80 किलोमीटरवर होती.

सकाळी साडेपाचला रेल्वे स्टेशन गाठत झुलन साडेसातच्या प्रशिक्षणाला जायची. त्याकाळच्या महिला क्रिकेटमधली उदासीनता तिच्या ध्येयाच्या आड आली नाही. ना उत्तम प्रशिक्षण सुविधा, ना महिला क्रिकेटसाठी उपलब्ध उत्तम क्रीडा सामुग्री असताना वेगात गोलंदाजी करण्याचा ध्येयाने पछाडलेली झुलन या धावपळीने थकून जायची, कित्येकदा हे सर्व सोडायचा विचारही तिने केला, पण आईच्या प्रोत्साहनाने तिने प्रशिक्षण चालूच ठेवले. प्रथम बंगाल मग पूर्व विभाग, एअर इंडिया अशा संघातून तिने 2002 साली इंग्लंडविरुद्ध आपले पदार्पण केले आणि काल इंग्लंडविरुद्धच लॉर्डस्ला अखेरचा सामना खेळून या देदीप्यमान कारकिर्दीचा शेवट केला.

झुलनच्या कालच्या अखेरच्या सामन्यात तिच्याबरोबर संघात असलेल्या शेफाली वर्मा आणि रिचा घोष झुलनने जेव्हा पदार्पण केले तेव्हा जन्मल्याही नव्हत्या. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत झुलनने अनेक विक्रमांना गवसणी घातली. एक दिवसीय सामन्यात 200 हून अधिक बळी, भारतातर्फे 1000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक बळी मिळवणारी एकमेव खेळाडू, सामन्यात दहा बळी मिळवणारी सर्वात लहान वयाची खेळाडू, महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू टाकणारी गोलंदाज, महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक पायचितचे बळी मिळवणारी क्रिकेटपटू असे अनेक विक्रम तिने आपल्या नावावर केले.

निमिष पाटगावकर

Back to top button