Jhulan Goswami: महिला क्रिकेटमधील 'झंझावात' आज थांबणार... जाणून घ्‍या झुलन गोस्‍वामीचा आजवरचा प्रवास | पुढारी

Jhulan Goswami: महिला क्रिकेटमधील 'झंझावात' आज थांबणार... जाणून घ्‍या झुलन गोस्‍वामीचा आजवरचा प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्‍क ; भारतीय महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज झुलन गोस्‍वामी आपल्‍या आतंरराष्‍ट्रीय कारकिर्दीतील शेवट सामना आज ( दि. २४ ) लॉर्ड्‍स मैदानावर खेळत आहे. झुलनने आजवर २०३ वनडे सामने खेळले आहेत. ती सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारी देशातील दुसरी महिला क्रिकेटपटू असून, निवृत्तीनिमित्त तिच्‍या  क्रिकेटमधील प्रवासाची थोडक्‍यात माहिती घेवूया …

झूलनने ६ जानेवारी २००२ राेजी इंग्लंडविरुद्धच्‍या सामन्‍यातच आपल्‍या आतंरराष्‍ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा केला होता. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट मंडळ ( आयसीसी ) २००५ आणि २०१७ महिला विश्‍वचषक स्‍पर्धेत तिने चमकदार कामगिरी केली. आजवर तिने आपल्‍या कारकीर्दीत एकूण ३५३ विकेट घेतल्‍या आहेत. वनडे सामन्‍यांमध्‍ये २५३ , कसोटीत ४४ तर  टी-२० सामन्‍यांमध्‍ये तिच्‍या नावावर ५६ विकेट आहेत.२००७ मध्‍ये ती ‘आयसीसी’ची सर्वात्‍कृष्‍ट महिला क्रिकेटपटू ठरली होती. २०१७च्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेतील उपांत्‍य सामन्‍यात झूलनने ऑस्‍ट्रेलियाची कर्णधान मेग लेनिंगला शून्‍यवर क्‍लीन बोल्‍ड केले होते. तिच्‍या कारकीर्दीतील ही स्‍मरणीय विकेट ठरली होती.

वनडेमध्‍ये दोनशेहून अधिक विकेट घेणारी जगातील एकमेव क्रिकेटपटू

वनडेमध्‍ये दोनशेहून अधिक विकेट घेणारी झूलनही ही जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. वनडेमध्‍ये तब्‍बल २५३ विकेट घेतल्‍याचा विक्रम तिच्‍या नावावर आहे. वनडेमध्‍ये एक हजार धावा आणि १००हून अधिक विकेट घेण्‍यार्‍या जगातील ११ महिला क्रिकेटपटूमध्‍ये झुलनचा समावेश आहे. तसेच एक हजार धावा, शंभर विकेट आणि ५० झेल टिपणार्‍या जगातील तीन महिला क्रिकेटपटूमध्‍येही तिचे नाव आहे.

झूलनच्‍या निरोपावेळी कर्णधान हरमनप्रीत कौर झाली भावूक

झुलन गोस्‍वामी आपल्‍या आतंरराष्‍ट्रीय कारकिर्दीतील शेवट सामना आज लॉर्ड्‍स मैदानावर खेळण्‍यासाठी उतरली. सामना सुरु होण्‍यापूर्वी झालेल्‍या कार्यक्रमात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर भावूक झाली. झूलनला निरोप देताना हरमनप्रीतला अश्रू अनावर झाले. हा भावूक क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल होत आहे.

सामना सूरु होण्‍यापूर्वी झूलन म्‍हणाली की, “मी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय ), बंगाल क्रिकेट संघ, प्रशिक्षक, माझे कुटुंब, आजवर झालेले कर्णधार या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानते. २००२ मध्‍ये माझ्‍या आतंरराष्‍ट्रीय क्रिकेटच्‍या प्रवासाला इंग्‍लंडमध्‍येच सुरुवात झाली होती. आता मी माझ्‍या कारकीर्दीतील अखेरचा सामनाही इंग्‍लंडमध्‍येच खेळत आहे.”

हेही वाचा : 

 

 

Back to top button