अणुऊर्जा आयोगाचा दबदबा! | पुढारी

अणुऊर्जा आयोगाचा दबदबा!

नवी दिल्ली : भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना 3 ऑगस्ट 1948 रोजी करण्यात आली. बुधवारी त्याचा वर्धापन दिन आहे. थेट पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या आयोगाचा आज जगभरात दबदबा आहे. या आयोगाने अणुविज्ञान, रासायनिक अभियांत्रिकी, आरोग्य, अन्न, औषधी, कृषी व पर्यावरण संवर्धनासह अनेक क्षेत्रांत योगदान दिले आहे. लेसर तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, उच्च दर्जाचे संगणन, रिअ‍ॅक्टर नियंत्रण आदी क्षेत्रांमध्ये अणुऊर्जा आणि संलग्न तंत्रज्ञानाचा उपयोग देशाला होत आहे.

उद्दिष्टे :
  • अणुऊर्जा खात्याचे धोरण ठरविणे.
  • अणुऊर्जा खात्याचा अर्थसंकल्प तयार करणे.
  • सरकारचे अणुऊर्जाविषयक धोरण राबविणे.
  • अणुऊर्जा क्षेत्रातील संशोधनाचे नियोजन करणे, अणुशास्त्रज्ञांना प्रशिक्षण देणे, आयोगाच्या प्रयोगशाळांमध्ये अणुसंशोधनाला प्रोत्साहन देणे आणि अणुऊर्जेसाठी आवश्यक खनिजांचा शोध घेऊन औद्योगिक वापरासाठी त्यांचे उत्खनन करणे, हेदेखील आयोगाचे उद्देश आहेत.
अणुऊर्जा आयोगांतर्गत देशपातळीवर पाच संस्था चालविल्या जातात
  • भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र (बीएआरसी) मुंबई
  • इंदिरा गांधी अणुऊर्जा संशोधन केंद्र (आयजीसीएआर) कलपक्कम (तामिळनाडू)
  • राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञान केंद्र (आरआरसीएटी) इंदूर
  • व्हेरिएबल सायक्लोट्रॉन सेंटर (व्हीईसीसी) कोलकाता
  • अणु खनिज उत्खनन आणि संशोधन संचालनालय (एएमडी) हैदराबाद

मुंबईतील बीएआरसी ही अणुऊर्जा आयोगाने स्थापन केलेली पहिली संस्था. 3 जानेवारी 1954 हा तिचा स्थापना दिवस. त्यावेळी अणुऊर्जा आस्थापना, ट्रॉम्बे (एईईटी) असे या संस्थेचे नाव होते. परंतु 1966 मध्ये संस्थेचे प्रमुख, भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे पितामह म्हणून ओळखले जाणारे होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाल्यानंतर 22 जानेवारी 1967 रोजी त्यांचे नाव या संस्थेला देण्यात आले.

  • देशातील पहिली अणुभट्टी तारापूर अणुऊर्जा स्थानकात बसविण्यात आली. ती अमेरिकेतून आयात करण्यात आली होती.
  • राजस्थानातील पोखरणच्या भूगर्भात 18 मे 1974 रोजी अणुऊर्जा आयोगाच्या देखरेखीत अणुचाचणी घेण्यात आली.
संशोधकांची परंपरा

अणुऊर्जा खात्याचे सचिव अणुऊर्जा आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानुसार या आयोगाला ख्यातनाम संशोधक अध्यक्ष म्हणून लाभले.

1. होमी जे. भाभा (1948-1966)                  2. विक्रम साराभाई (1966-1971)

3. एच.एन. सेठना (1972-1983)                  4. राजा रामण्णा (1983-1987)

5. एम.आर. श्रीनिवासन (1987-1990)          6. पी. के. अयंगार (1990-1993)

7. आर. चिदंबरम (1993-2000)                  8. अनिल काकोडकर (2000-2009)

9. श्रीकुमार बॅनर्जी (2009-2012)                10. रतनकुमार सिन्हा (2012-205)

11. शेखर बसू (2015-2018)                      12. के. एन. व्यास (2018-विद्यमान)

भाभा केंद्रातील अणुभट्ट्या

अप्सरा : 1956, तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी अप्सरा हे नाव दिले.
सायरस : 1960, कॅनडा आणि अमेरिकेच्या सहकार्याने
झेरलिना : 1961, मात्र आता बंद पडली आहे.
पौर्णिमा : 1972 पूर्णिमा 1, 1984 पौर्णिमा 2, 1990 पौर्णिमा 3
कामिनी : 1990 मध्ये ही अणुभट्टी उभारली गेली.

…आणि बुद्ध हसला

बीएआरसी अभियंत्यांनी तयार केलेल्या अणुबॉम्बची पोखरणमध्ये इंदिरा गांधींच्या काळात 1974 मध्ये चाचणी घेण्यात आली. ‘स्मायलिंग बुद्धा’ हे या चाचणीचे सांकेतिक नाव होते. बॉम्ब पूर्णपणे भारतीय बनावटीचा होता. प्लुटोनियमही सायरस अणुभट्टीत तयार केले होते. दुसरी अण्वस्त्र चाचणी मे 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या काळात करण्यात आली.

Back to top button