पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या मल्टीस्टारर मालिकेत झळकलेले ज्येष्ठ अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय माजी काँग्रेस नेत्या राधिका खेर यांनाही भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. लोकसभा निवडणुकीदरम्यान शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश हा इंडिया आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिनेते शेखर सुमन यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले आहे, "कालपर्यंत मला माहित नव्हते की मी आज इथे बसेन. कारण आयुष्यात अनेक गोष्टी जाणूनबुजून अथवा नकळत घडतात. मी इथे खूप सकारात्मक भावनेने आलो आहे. मी देवाचे आभार मानू इच्छितो. की त्याने मला इथे येण्याचा आदेश दिला…"
देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यादरम्यान, शेखर सुमन यांना कमळ हाती घेतले आहे. पण ते भविष्यात निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शेखर सुमन यांची राजकारणातील ही दुसरी इनिंग आहे. यापूर्वी त्यांनी २०१२ मध्ये काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. त्यांनी २००९ ची लोकसभा निवडणूक पटना साहिब मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. पण त्यांना भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
राधिका खेरा आणि शेखर सुमन यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेतले. काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया समन्वयक राधिका खेरा यांनी छत्तीसगड काँग्रेसच्या संवाद विभागाचे अध्यक्ष सुशील आनंद शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आरोप करत म्हटले होते की, सुशील यांनी मला दारू ऑफर केली होती. रात्री त्यांनी माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला.
शेखर सुमन यांनी शशी कपूर निर्मित आणि गिरीश कर्नाड दिग्दर्शित उत्सव या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात शेखर सुमन यांनी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्यासोबत काम केले होते. त्यांनी मानव हात्य, नाचे मयुरी, संसार, अनुभव, त्रिदेव, पती परमेश्वर आणि रणभूमी यासह जवळपास ३५ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हे ही वाचा :