प्रादेशिक पक्षांना संपविण्यासाठी भाजपकडून पैशाचा वापर: चंद्रकांत खैरे यांचा आरोप | पुढारी

प्रादेशिक पक्षांना संपविण्यासाठी भाजपकडून पैशाचा वापर: चंद्रकांत खैरे यांचा आरोप

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा: देशातील प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा विडा भाजपने उचलला आहे. त्यासाठी पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. शिवगर्जना अभियानासाठी गडचिरोली येथे आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खैरे पुढे म्हणाले की, प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष पैशांचा प्रचंड वापर करीत आहे. जे नेते पैशाच्या आमिषाला बळी पडले नाहीत; त्यांच्या मागे ईडी, आयकर विभाग यासारख्या संस्थांना लावून त्यांना सूड भावनेतून तुरुंगात डांबले जात आहे, असा आरोप खैरे यांनी केला.

देशाचे गृहमंत्री अमित शहा स्वतः उपग्रहाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ नियंत्रित करीत आहेत. यासाठी त्यांनी काही माणसे ठेवली असून त्यातील एकाने मला ही गोपनीय बाब सांगितली, असा गौप्यस्फोट करून खैरे यांनी यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली.

निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष या वादात घेतलेली भूमिका संशयास्पद असल्याचे खैरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button