पुणेकरांनो सावधान! शहर बनलं उष्णतेच बेट; तापमान सतत 43 अंशांवर | पुढारी

पुणेकरांनो सावधान! शहर बनलं उष्णतेच बेट; तापमान सतत 43 अंशांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील कोरेगाव पार्क, मगरपट्टा, लोहगाव हे भाग उष्णतेची बेटं बनली आहेत. कारण, या भागांचे कमाल तापमान सतत 43 अंशांवर जात आहे. या भागांतून उष्णताच बाहेर जात नसल्याने येथे सर्वाधिक उष्मा आहे. मार्च महिन्यात कोरेगाव पार्कपासून शहरातील कमाल तापमान 41 अंशांवर जात आहे. 25 मार्चपासून तेथील तापमान सतत 42 ते 43 अंशांवर जात आहे. एप्रिलमध्ये सलग दहा ते पंधरा वेळा येथील तापमान सतत 43 अंशांवर गेले आहे.

तसेच, मगरपट्टा, वडगाव शेरी, लोहगाव हे भागही उष्णतेची बेटं बनली आहेत. हवामानतज्ज्ञांच्या मते शहरात गुजरातच्या वाळवंटातून सतत उष्ण झळा येत आहेत. मात्र, हे उष्ण वारे या भागात कोंडले जात आहे. दिवसा आणि रात्रीही ते बाहेर पडत नाही. त्यामुळे रात्रीचे तापमानसुद्धा 28 ते 30 अंशांवर गेले आहे. त्यामुळे शहरात रात्री भयंकर उकाडा जाणवत आहे.

पुणेकर दिवसभर कुलरसमोर…

मंगळवारी शहरातील सरासरी कमाल तापमान 42 ते 43 अंशांवर गेले होते. फक्त शिवाजीनगरचा पारा 41.8 अंशांवर सोमवारपासून स्थिर आहे. त्यामुळे पुणेकर या उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. यंदा मार्च व एप्रिलमध्ये शहरात सरासरीपेक्षा 96 टक्के पाऊस कमी झाल्यानेही उकाडा असह्य होत आहे. एकदाही मोठा पाऊस गेल्या 60 दिवसांत झाला नाही. त्यामुळे घराघरांत दिवसभर पंखे, कुलर सुरू आहेत. एका खोलीतून दुस-या खोलीत जातानाही उष्णता जाणवत आहे.

शहराचे मंगळवारचे कमाल-किमान तापमान

कोरेगाव पार्क 43 (26.8), मगरपट्टा 43 (28.8), लोहगाव 43 (25.9), शिवाजीनगर 41.8 (22.4), लवळे 42 (23), एनडीए 42 (23), पाषाण 41 (23.4).

शहरात सतत गुजरातमधील वाळवंटातून उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे उष्मा खूप जास्त जाणवत आहे. शहरातील बहुतांश भागांतून उष्णताच बाहेर पडत नाही, त्यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे.

-अनुपम कश्यपी, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे

हेही वाचा

Back to top button