औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या विरोधात रविवारी (दि.9) औरंगाबाद येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. खैरे यांच्या विरोधात कलम 153-ए(1)(ब), 189, 505(1)(ब) ही कलमे लावण्यात आली आहेत.
रविवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा ही मागणी घेऊन शिंदे सेनेचे पदाधिकारी गेले. तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे शिष्टमंडळ सातारा पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी खैरे यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीत म्हटले आहे की, चंद्रकांत खैरे यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, "मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून लटकून मारले असते". तसेच अनेकदा बोके, चोर, रिक्षावाला असे शब्द वापरून शिंदे यांना अपमानित केले. त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच शिंदे यांची सार्वजनिक ठिकाणी खिल्ली उडवण्याच्या दृष्टीने सोशल मिडियावर असंविधानिक भाषेचा वापर करणे, दोन गटात भांडण लावणे, दंगल घडवण्याच्या दृष्टीने वक्त्व्य करणे व त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणे, असे अनेक बेकायदेशीर वर्तन ते करत असतात, यामुळे शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. मुख्यंत्र्यांबद्दल केलेल्या विधानामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील कराळे हे करत आहेत.
गुन्हा दाखल झाला असेल तर होऊ द्या, मी घाबरत नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, शिवसेना ही संघटना पूर्णपणे फोडली. गेल्या पन्नास वर्षात खलिस्तानवाद्यांना, पाकिस्तानवाद्यांना कधीही हे जमले नव्हते. पण एका मराठी माणसानेच हे पाप केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करुन मराठी माणसांना न्याय दिला. हिंदूंचे रक्षण केले. ती संघटना कुणी फोडत असेल, संपविण्याचा प्रयत्न करत असेल तर राग येणे स्वाभाविक आहे.
ते पुढे असेही म्हणाले की, हा संताप केवळ माझा एकट्याचा नाही. आज महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांनाही एवढाच राग आलेला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला शांत रहायला सांगितले आहे, म्हणून आम्ही शांत आहोत. या गद्दारांनी भाजपकडून खोके घेऊन संघटना फोडण्याचे पाप केले आहे. त्याबद्दल त्यांना कोणीही माफ करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.
हेही वाचा