चंद्रकांत खैरे यांचे फडणवीसांना प्रत्युतर; पाच वर्षात औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही ? | पुढारी

चंद्रकांत खैरे यांचे फडणवीसांना प्रत्युतर; पाच वर्षात औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही ?

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगरच आहे, ते करायची गरज नाही असे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बीकेसी मैदानावरील सभेत म्हटले होते. त्यावरुन भाजपचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तसेच औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेनेने संभाजीनगरची मागणी सोडली आहे, असे सांगत अहो खैरे, व्हा आता बहिरे, असा टोलाही लगावला. त्याला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उत्तर दिले आहे.

खैरे म्हणाले, फडणवीस हे स्वत: पाच वर्ष मुख्यमंत्री होते. संभाजीनगरचा मुद्दा घेऊन मी त्यांना वारंवार भेटलो, त्यांनी का नाही हे नामकरण केल. मुळात फडणवीस हे जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांनी संभाजीनगरसाठी काहीही केलेले नाही. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने चिकलठाणा विमानळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठविला. त्याचाही मी पाठपुरावा केला. पण केंद्राने तेही केले नाही, असे खैरे म्हणाले.

शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे ही आमची जुनी मागणी आहे. ती मागणी आम्ही सोडलेली नाही. शहराचे नाव अधिकृतपणे संभाजीनगर होणारच आहे. एखाद्या दिवशी तेही होईल, असेही खैरे म्हणाले.

 

Back to top button