नागपूर येथे गुजरातमधून आणलेले तीन हजार किलो प्लास्टीक जप्त | पुढारी

नागपूर येथे गुजरातमधून आणलेले तीन हजार किलो प्लास्टीक जप्त

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात दहा प्रतिष्ठानांवर प्लास्टीक वापरायच्या विरोधात कारवाई करत ७ लाख ५ हजार रुपयांचा दंड नागपूर प्रशासनाने वसूल केला आहे. प्लास्टिक वापरा विरोधात नागपुरात प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे.

नागपूर शहरात प्लास्टिक विक्री विरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाते आहे. गुजरातमधून आणलेले तीन हजार किलो प्लास्टिक प्रशासनाकडून जप्त करण्यात आल्याने प्लास्टिक विक्रेत्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र शहरात बघायला मिळते आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्लास्टिक बंदी आहे. मात्र, अनेक ठिकाणी अजूनही सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जातो आहे. राज्यात जरी प्लास्टिकवर बंदी असली तरी इतर राज्यातून प्लास्टिक आयात केले जात असल्याने अनेक ठिकाणी प्लास्टिक विक्री सुरू आहे. सध्या राज्यात सणासुदीला सुरूवात झाल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केला जातोय. मात्र, आता प्लास्टिक विक्री करणाऱ्यावर प्रशासनाने धडक कारवाई करण्यास सुरूवात केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

शहरातील तीन हजार किलो प्लास्टिकवर नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ही कारवाई केली आहे. यामध्ये प्रशासनाकडून तब्बल १० प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली असून ७ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. धंतोली, गांधीबाग, लकडगंज आणि सतरंजीपुरा झोनमध्ये ही कारवाई केली आहे. प्लास्टिक बंदी असताना शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर केला जातो आहे.

Back to top button