बुलढाणा : दिव्यांग तरुणीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस आजन्म सश्रम कारावास | पुढारी

बुलढाणा : दिव्यांग तरुणीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस आजन्म सश्रम कारावास

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : मुकबधीर व दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या एकवीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम वृद्धास जिल्हा न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

देऊळगावराजा तालुक्यातील एका गावात 18 जुलै 2021 रोजी दिव्यांग तरुणी घरात एकटीच होती व तिची आई मजुरीसाठी शेतात गेलेली होती, हे पाहून आरोपी दिलीप संपत भालेराव (वय 60,रा.निमगाव गुरू) या नराधमाने दिव्यांग तरुणीच्या घरात घुसून बाथरूममध्ये तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणी मूकबधीर व दोन्ही पायांनी दिव्यांग असल्याने आरोपीस प्रतिकार करू शकली नाही. आरोपी घरात घुसल्याचे शेजारच्या नातेवाईक महिलांनी पीडित तरुणीच्या आईला कळवले. तातडीने घराकडे धाव घेतलेल्या आईला आपल्या मुलीवर आरोपी अत्याचार करताना दिसला. आईने पाहिल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला.

या प्रकरणी देऊळगावराजा पोलिसांत गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक केली होती. पुढे घटनेचा तपास करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणी दरम्यान एकूण अकरा साक्षी नोंदण्यात आल्या. पीडित तरुणी ही पूर्णत: दिव्यांग असल्याने तिची साक्ष नोंदविण्यात आले नाही. तिच्या आईची साक्ष व वैद्यकीय अहवालावरून, जिल्हा न्यायाधीश आर.एन.मेहरे यांनी आरोपी दिलीप भालेराव याला आजन्म सश्रम कारावास व एक हजार रू.दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील सोनाली सावजी-देशपांडे यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली.

Back to top button