प्रामाणिकपणाने यश नक्कीच : डॉ. शंकरबाबा पापळकर | पुढारी

प्रामाणिकपणाने यश नक्कीच : डॉ. शंकरबाबा पापळकर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कुठलेही काम प्रामाणिकपणे तसेच कठोर परिश्रमपूर्वक केल्यास यश नक्कीच मिळेल, असे प्रेरणादायी मार्गदर्शन पद्मश्री, अनाथ मुलांचे नाथ आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी दिल्लीत केलं. ते महाराष्ट्र परिचय केंद्राला भेटीदरम्यान हे बोलले आहेत.

आज गुरूवारी ( दि. ९ मे) रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. पापळकर यांच्यासोबत त्यांच्या मानसकन्या गांधारी आणि मानसपुत्र योगश दिल्लीत आले आहेत. नागपुरातील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेकजण त्यांचे स्वागतासाठी उपस्थित होते. महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. पापळकर यांचे स्वागत उपसंचालक (माहिती) श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले.

यावेळी त्यांच्यासोबत सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग नितीन पाटील, संपादक- रोजगार नोकरी संदर्भ संजय नाथे, अनाम प्रेम संस्थेचे सदस्य प्रशांत भाट, मानसकन्या गांधारी आणि मानसपुत्र योगश यांचेही स्वागत श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

डॉ. पापळकर यांनी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अत्यंत आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. “हा पुरस्कार मला नाही तर अनाथ मुलांना मिळाला आहे,” तसेच “या मुलांसाठी काम करणे हे माझे जीवन आहे आणि मी माझ्या आयुष्याचा शेवटपर्यंत हे कार्य करत राहीन,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ. पापळकर यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात १४ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला. धोब्याचा व्यवसाय ते पत्रकारिता आणि पुढे रस्त्यावरच्या अनाथ, अपंग, गतिमंद आणि दिव्यांग मुलांच्या वेदनांनी त्रस्त झाल्याचे सांगत त्यांनी आपल्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. वंचित घटकांसाठी संगोपन आणि पुनरुत्थानासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, १९९० च्या दशकात त्यांनी वझ्झर या गावात “स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह” नावाचा आश्रम स्थापन केला. या आश्रमात अपंग, बेवारस, गतिमंद आणि अपंग मुलांचा सांभाळ करून ते भारतात एक रोल मॉडेल बनले आहे.

कुठलेही शासकीय अनुदान न घेता हा आश्रम सुरू आहे. समाजाकडून मिळणाऱ्या दानावर आणि शेगाव संस्थान आणि अंबादास पंथ बालगृहाचे संचालक प्रभाकर वैद्य यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीवर हा आश्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या मुलांना स्वावलंबी बनवणे हे त्यांचे ध्येय असून या मुलांना त्यांचे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. हा आश्रम सुरू झाल्यानंतर २०० मूले आश्रमात होती. आजवर आश्रमातल्या ३० मूकबधिर-गतिमंद मुलामुलींचे लग्न लावल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत आश्रमातील १२ जण शासकीय सेवेत रुजू झाले आहेत आणि यासोबत त्यांना जगण्याचा अधिकार मिळाल्याचे सांगत, त्यांनी आनंद व्यक्त केला.

सद्या त्यांच्या आश्रमात ९६ मुली व २५ मुले अशी एकूण १२३ मुले वास्तव्यास असून, डॉ. पापळकर त्यांचे संगोपन व शिक्षणापासून ते पुनर्वसन करीत असल्याचेही त्यांनी सांगतिले. आश्रमात डॉ. पापळकर यांनी मुलांच्या सहाय्याने १५००० वृक्ष लावून वनराई फुलविली आहे. बेवारस आणि दिव्यांगांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करत, दिव्यांगांच्या पुनर्वसनाबाबत यावेळी चिंता व्यक्ती केली. शासकीय कायद्यानुसार १८ वर्षावरील मुलांना रिमांडमधून काढून टाकले जाते, याची खंत व्यक्त करत, १८ वर्षांपर्यंत ठेवणा-या रिमांड होमच्या कायद्यात आवश्यक बदल घडवून अशा मुलांसाठी संगोपन तसेच पुनर्वसनासाठी पावले उचलण्याची त्यांनी यावेळी इच्छा व्यक्त केली.

गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग, मतिमंद, मुकबधीर, दृष्टीहीन आणि निराश्रीत मुलांना आश्रय देऊन त्यांच्या संगोपनाची अतिशय कठीण जबाबदारी डॉ. पापळकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. याच अतुलनीय कार्याची भारत सरकारने दखल घेत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

हेही वाचा 

Back to top button