डेल्टा प्लसचे रुग्ण वाढले, नव्या अहवालात २७ पैकी २१ रुग्ण विदर्भातील | पुढारी

डेल्टा प्लसचे रुग्ण वाढले, नव्या अहवालात २७ पैकी २१ रुग्ण विदर्भातील

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: विदर्भातील दैनंदीन कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली असतानाच अचानक डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राज्यातील डेल्टा प्लस च्या रुग्ण संख्येतील नव्या आकडेवारीत २७ पैकी २१ डेल्टा प्लसचे रूग्ण हे विदर्भातील असल्याचे आढळले आहे.

नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार राज्यात २७ डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले असून, यात २१ रुग्ण एकट्या विदर्भातील असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

यामध्‍ये नागपुरातील ५, अमरावती ६, गडचिरोली ६, यवतमाळ ३ आणि भंडाऱ्यातील एकाचा समावेश आहे.

अहमदनगरमध्ये चार व नाशिकमध्येही दोघांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

नागपुरातील करोना बाधितांची संख्या कमी असली तरी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

विदर्भात एकाच दिवशी २१ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या १०३ झाली आहे.

गेल्या काही दिवसांतील नागपुरातील करोना बाधितांची संख्या बघितली तर एक किंवा दोन अशी बोटावर मोजण्या इतकी आहे.

बाधितांची संख्या कमी असल्याने नागपुरातील निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत.

आतापर्यंत नागपुरात डेल्टाचेच रुग्ण नोंदविण्यात आले होते.

मात्र नुकत्याच आलेल्या अहवालानुसार यापूर्वी आढळलेल्या रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे काही रुग्ण असल्याने आता प्रशासनासमोर अधिक सतर्कता घेण्याचे आव्हान आहे.

लसीकरणामुळे संसर्ग फारसा वाढत नसला तरी करोनाचा धोका कमी झाला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी कोव्हिड रुग्णांचे जिनोमिक सिक्वेंसिंग नियमित स्वरूपात करण्यात येत आहे.

दोन पद्धतीने या तपासण्या करण्यात येतात. सेंटीनल सर्वेक्षण या तपासण्यांसाठी राज्यात ५ प्रयोगशाळा आणि ५ रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे.

डेल्टा प्लस रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यात विशेष खबरदारी घेण्यात येते.

विभागीय पातळीवर रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करणे, रुग्णांची सविस्तर माहिती घेणे,

युद्धपातळीवर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, फ्ल्यू सदृश्य आजाराचे आणि सारी आजाराचे सर्वेक्षण करणे, संसर्ग झालेल्या व्यक्तींचा शोध घेणे या बाबी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडिओ : परदेशात कमावण्याची संधी देते हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण 

Back to top button