अल्पवयीन मुलीकडून ‘हिट अन्ड रन’ | पुढारी

अल्पवयीन मुलीकडून ‘हिट अन्ड रन’

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती शिरूर तालुक्यातील आरणगाव येथे घडली. येथील पोलिस पाटलांच्या अल्पवयीन मुलीने चालविलेल्या पिकअपने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर पिकअपच्या पाठीमागील चाकाखाली दुचाकीसह त्याला 30 फूट फरपटत नेले. त्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. शुक्रवारी (दि. 31 मे) सकाळी सव्वादहाच्या सुमारास हा अपघात घडला.

पोलिस पाटलास अटक; अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी

अरुण विठ्ठल मेमाणे (वय 30) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे, तर महेंद्र रावसाहेब बांडे (वय 26, दोघेही रा. वडगाव बांडे, ता. दौंड) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अरुणचा भाऊ सतीश विठ्ठल मेमाणे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे व अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल केला. पोलिस पाटलाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवार (दि. 3 जून)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

पीडितांना फरफटत नेले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण मेमाणे व त्यांचा मित्र महिंद्र बांडे हे दोघे शुक्रवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच 12 वीआर 2072) वडगाव बांडे येथून डीपीचे ऑईल आणण्यासाठी न्हावरे (ता. शिरूर) येथे जात होते. त्या वेळी आरणगावातील पिकअपवरील (एमएच 12 एसएफ 3439) अल्पवयीन चालक मुलीने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. त्यानंतर पिकअपच्या मागील चाकाखाली दुचाकीसह दोघांनाही 20 ते 30 फूट अंतर फरपटत नेले. या घटनेत मेमाणे आणि बांडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मेमाणे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर बांडे याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

स्थानिक नागरिकांची मदतीस धाव

पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे यांनी त्यांच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्यांच्या मालकीची पिकअप चालवण्यास दिली व ते स्वतः बाजूला बसले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार या दोघांनाही अटक करण्यात आली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मेमाणे याचे कुटुंबीय व नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी पिकअपखाली जखमी अरुण मेमाणे आणि त्याची दुचाकी दिसून आली. हे दृश्य पाहून मेमाणे कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मेमाणे आणि बांडे यांना तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button