Lok Sabha Exit Poll 2024 | मतमोजणीसाठी पाचशेहून अधिक सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा

Lok Sabha Exit Poll 2024 | मतमोजणीसाठी पाचशेहून अधिक सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा – शहरातील अंबड येथील वेअर हाऊसमध्ये येत्या मंगळवारी (दि. ४) रोजी दिंडाेरी आणि नाशिक लाेकसभा निवडणुकीची मतमाेजणी हाेणार आहे. या मतमोजणीदरम्यान कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, यासाठी मतमोजणी केंद्रासह बाहेरील परिसरात पाचशेहून अधिक सशस्त्र पोलिस तैनात राहणार आहे. यावेळी फक्त परवानगी आणि प्राधिकारपत्र बाळगणाऱ्या व्यक्तींना मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूला प्रवेश असणार आहे.

जिल्ह्यातील दोन मतदारसंघातील निवडणूका २० मे रोजी पार पडले होते. चार जून राेजी मतमाेजणी प्रक्रिया पार पडणार आहे. ती शांततेत हाेण्यासाठी शहर पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे पाेलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, वाहूतक व मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, माेनिका राऊत यांच्या निर्देशांनुसार सर्वच सहायक आयुक्त, वरिष्ठ पाेलीस निरीक्षकांनी मतमाेजणी बंदाेबस्ताचे नियाेजन पूर्ण केले आहे. त्यानुसार, परिमंडळ दाेनच्या अखत्यारितील सातपूर, अंबड, एमआयडीसी पाेलीस चाैकी, इंदिरानगर, उपनगर, नाशिकराेड, देवळाली कँम्प आणि पाेलीस मुख्यालयासह गुन्हेशाखा, अभियाेग कक्ष, आर्थिक गुन्हेशाखा, गुंडाविराेधी पथक, महिला सुरक्षा विभाग, टीएडब्लू, वाहतूक शाखा, विशेष शाखांचे पाेलिस निरीक्षक, अंमलदार, साध्या वेशातील पाेलीस स्ट्राँगरुमसह मतमाेजणी कक्ष, अंबड वेअर हाऊस येथे तैनात असणार आहेत.

दाेन तासांनी सुरक्षेचा आढावा

नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघासाठी असलेले मतदान २० मे रोजी पुर्ण झाले. त्यानंतर अंबड येथील स्ट्राॅंगरुममध्ये व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट चाेख बंदाेबस्तात सुरक्षित ठेवण्यात आले. या ठिकाणी २४×७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून बाहेरील पाेलीसांसह सशस्त्र दलाच्या तुकड्या, वरिष्ठ अधिकारी तैनात आहेत. दर, दाेन तासांनी स्ट्राँगरुमच्या सुरक्षेचा आढावा शहर पाेलीस घेत आहे.

असा असेल बंदाेबस्त

  • सीआरपीएफ, एसआरपीएफच्या तुकड्या
  • तीन स्ट्रायकिंग फाेर्स (एकूण ३० अंमलगार)
  • एटीएसचे अधिकारी, क्युआरटी, आरसीपी आणि अग्निश्मन दल
  • सकाळी सात वाजेपासून मतमाेजणी पूर्ण हाेईपर्यंत बंदाेबस्त

तैनात अधिकारी

  • पाेलीस आयुक्त
  • उपायुक्त-४
  • सहायक आयुक्त-८
  • पाेलीस निरीक्षक -१५
  • एपीआय/पीएसआय-३३
  • अंमलदार-२५५
  • महिला अंमलदार-१००

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news