नागपूरचा पारा वाढला! उष्माघाताने तिघांचा मृत्यू | पुढारी

नागपूरचा पारा वाढला! उष्माघाताने तिघांचा मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठ दिवसांपासून नागपूर शहरातील तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. अशाच परिस्थितीत नागपुरातील विविध भागात बेशुद्धावस्थेत सापडलेले तीनही इसम मृत्यूमुखी पडल्यामुळे हे मृत्यू उष्माघाताने झाले असल्याचा अंदाज आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागपुरातले तापमान काही कमी होताना दिसत नाही. गेल्या आठ दिवसांत ४४ ते ४५ अंश डिग्री सेल्सिअस तापमान कायम आहे.

त्यामुळे या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ६ जून रोजी गणेशपेठ पोलीस हद्दीतील अशोक चौकात ५० वर्षीय व्यक्ती बेशुद्ध सापडला. त्याला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. ७ जून रोजी ५० वर्षीय व्यक्ती गड्डीगोदाम येथे बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Gनागपुरातील सदर ठाण्याअंतर्गत छावणी बस स्टँडजवळ ८ जून रोजी ४५ वर्षीय व्यक्ती बेशुद्ध सापडला होता. रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत जाहीर केले. अशीच घटना अजनी पोलीस हद्दीतही घडली. टीबी वॉर्ड परिसरात ३७ वर्षीय व्यक्ती बेशुद्ध पडला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. नागपुरात गेल्या तीन दिवसांत हे चार लोकं रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडलेत. या बेशुद्ध अवस्थेतील नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चार जणांपैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले आहे. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तीन दिवसांत बळी गेलेले लोकं हे रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. त्यामुळे हे उष्माघाताचे बळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 हे ही वाचा :

Back to top button