तापमानवाढ आणि अन्‍न संकट

तापमानवाढ आणि अन्‍न संकट

उष्णतेची लाट भविष्यात अधिक तीव्र होणार आहे. विशेषतः पिकांवरील परिणामाच्या द‍ृष्टीने अशा लाटा अधिक चिंताजनक असतील, असा सावधगिरीचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अलीकडील काळात भारत आणि पाकिस्तानमध्ये कोळसा आणि गॅससारख्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे उष्णतेच्या लाटा येत आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये उष्माघाताने 90 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्ड वेदर अ‍ॅट्रिब्यूशनच्या (डब्ल्यूडब्ल्यूए) या हवामान शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाच्या अहवालानुसार, मानवी हस्तक्षेप नसता, तर तापमान एक अंश सेल्सिअसने कमी असते आणि त्याची शक्यताही 30 पटींनी कमी झाली असती.

गेल्या आठवड्यात ब्रिटनच्या हवामान खात्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, मानवी हस्तक्षेपामुळे अतिउष्णतेचा धोका शंभर पटींनी वाढला आहे. या विश्‍लेषणांमुळे असेही निदर्शनास आले आहे की, कार्बन प्रदूषण आधीच समाजाला घातक ठरत आहे. भीषण उन्हामुळे भारतातील जंगलात आगी लागत आहेत. हिमनद्या वितळू लागल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानात अचानक पूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत आणि दोन्ही देशांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. पिकांच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे.

आयआयटी दिल्लीचे शास्त्रज्ञ आणि डब्ल्यूडब्ल्यूएच्या संशोधन निबंधाचे सहलेखक कृष्णा अच्युतकाव यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक तापमानाच्या दृष्टीने या प्रकारची उष्णतेची लाट भविष्यात अधिक तीव्र होणार आहे. विशेषतः पिकांवरील परिणामाच्या दृष्टीने अशा लाटा अधिक चिंताजनक असतील, असा सावधगिरीचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. हवामानविषयक घडामोडींचा अभ्यास करणार्‍या युनायटेड नेशन्स एजन्सी या जागतिक हवामान संघटनेने गेल्या बुधवारी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, युक्रेन संघर्ष, जलवायू परिवर्तन, कोव्हिड आणि अर्थव्यवस्थेतील संकटांची मालिका यामुळे अन्‍नसुरक्षेच्या द‍ृष्टीने अनेक दशकांच्या प्रगतीला खीळ बसली होती. अर्धपोटी राहणार्‍यांची संख्या 2010 च्या दशकात सातत्याने घटत होती; परंतु 2020 च्या दशकात त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, असा अंदाज आहे. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यामुळे जगातील दोन सर्वांत मोठ्या गहू निर्यातदार देशांची धान्य निर्यात व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चीननंतर गव्हाचा दुसरा सर्वांत मोठा उत्पादक देश असलेल्या भारताने उष्णतेने जळलेली शेते आणि पिकांचे नुकसान पाहून निर्यातीवर बंदी घातली.

 डब्ल्यूडब्ल्यूएच्या अभ्यासात सहभागी असलेल्या इंटरनॅशनल रेडक्रॉस रेड क्रिसेन्ट

क्लायमेट सेंटरमधील जोखीम व्यवस्थापन क्षेत्रात काम करणार्‍या तज्ज्ञ आदिती कपूर म्हणतात की, पीक कापणीसाठी तयार होत असताना गव्हाला कडक उन्हाचा फटका बसला. भारतातील 10 ते 30 टक्के गव्हावर त्याचा परिणाम झाला असल्याचा अंदाज आहे. सुरुवातीला शेतकरी त्रस्त झाला आणि नंतर भाववाढ झाल्यावर अन्‍नधान्य खरेदी करणार्‍या गरीब लोकांवर परिणाम झाला. एनर्जी रिसर्च अँड सोशल सायन्स या जर्नलमध्ये गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, 1965 ते 2018 दरम्यान पृथ्वीचे तापमान वाढविण्यास जीवाश्म इंधन उत्सर्जन आणि सिमेंट उत्पादनासाठी वीस कंपन्या जबाबदार होत्या. यामध्ये या कंपन्यांनी अन्य कंपन्यांना विकलेल्या जीवाश्म इंधनामुळे झालेल्या प्रदूषणाचाही समावेश होता.

शेवरन, एक्सॉनमोबिल, बीपी आणि शेल या चार सर्वांत मोठ्या, गुंतवणूकदारांच्या मालकीच्या जीवाश्म इंधन कंपन्या 11 टक्के उत्सर्जनासाठी जबाबदार होत्या. उष्णतेच्या लाटेचा जागतिक हवामानावर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हिमनद्या वितळू शकतात आणि अचानक पूर येऊ शकतो. अशाच एका पुरामुळे मे महिन्यात पाकिस्तानात प्रचंड हानी झाली होती आणि पूल वाहून गेले होते. तुलनेने उबदार हवेत अधिक आर्द्रता असते. त्यामुळे पाऊस जास्त पडतो. जलवायू परिवर्तनास कारणीभूत असलेले इतर घटक मात्र वेगळ्या पद्धतीने कार्य करू शकतात. गेल्या आठवड्यात आसाम आणि अरुणाचल प्रदेशसारखी ईशान्येकडील राज्ये अतिवृष्टी आणि उष्णतेच्या दुहेरी तडाख्यात सापडली होती. औद्योगिक क्रांती सुरू झाल्यापासून लोकांनी पृथ्वीचे तापमान 1.1 अंशांनी आधीच गरम केले आहे. 2015 मध्ये जागतिक नेत्यांनी या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमान 1.5 अंशांपर्यंत सीमित करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news