गडचिरोली : ‘रोहयो’च्या कामावरील तरुणीचा उष्माघाताने मृत्यू | पुढारी

गडचिरोली : 'रोहयो'च्या कामावरील तरुणीचा उष्माघाताने मृत्यू

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : रोजगार हमी योजनेचे काम करीत असताना एका तरुणीचा अचानक उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२) सकाळी ९ च्या सुमारास कोरची तालुक्यातील भिमपूर येथे घडली. सुनीता सुंदर पुडो (वय २४, रा. नवरगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे.

नवरगाव ग्रामपंचायती अंतर्गत भीमपूर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत नाला सरळीकरणाचे काम २७ मेपासून सुरु आहे. आज या कामाचा शेवटचा दिवस होता. अनेक पुरुष आणि महिला मजूर सकाळी ७ वाजताच कामावर गेले होते. त्यात सुनीता पुडो हिचादेखील समावेश होता. काम करीत असताना सुनीताला अचानक भोवळ आली. लगेच तिला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुणे यांनी तिला मृत घोषित केले. सुनीताचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे डॉ. खुणे यांनी सांगितले.

यावेळी सरपंच कौशल्या काटेंगे, के. बी. वासनिक, रोजगार सेवक शामराव अंबादे उपस्थित होते. मृत सुनीताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. कुटुंब भूमिहीन असल्याने मजुरी करूनच घरचा उदरनिर्वाह चालवला जातो. त्यामुळे शासनाने सुनीताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button