कमी पैशात झटपट नशा.. कफ सिरफचा वापर वाढला | पुढारी

कमी पैशात झटपट नशा.. कफ सिरफचा वापर वाढला

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  नशेसाठी वापर करण्यात येणाऱ्या अमली पदार्थाने मुंब्रा, भिवंडी, कळवा, ठाणे परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर आता कफ सिरफ़ आणि झोपेच्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापर करण्यात येत आहेत. अशा औषधींची तस्करी देखील जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नशेसाठी वापर होणाऱ्या कफ सिरफच्या वादातून मुंब्रात दोन दिवसांपूर्वी एका ३० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार मुंब्य्रा समोर आल्यानंतर कफ सिरफचा नशेसाठी होणारा वापर आणि त्याची होणारी मोठ्या प्रमाणावरील तस्करी पुन्हा एकदा समोर आली आहे.

मुंबईच्या एनसीबी युनिटने काही महिन्यांपूर्वी भिवंडीतून कफ सिरफचा मोठा साठा पकडला होता. हे कफ सिरफ मुंबई आणि ठाण्यातील विविध भागांमध्ये मादक पदार्थ म्हणून पुरवले जाणार होते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषध नशा करण्यासाठी वापरली जाणार होती. नशेसाठी कफ सिरफचा वापर होणे ही काही नवीन बाब नाही. यापूर्वी देखील पोलिसांनी अनेक वेळा नशेसाठी कफ सिरफचा वापर करणाऱ्या तस्करांना पकडले आहे. काही महिन्यांपूर्वी कळवा खारेगाव टोलनाक्यावर रिक्षातून कफ सिरपचा साठा नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून रिक्षा आणि कफ सिरपच्या बॉटल्स असा ३ लाख २१ हजार २८० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला होता. भिवंडी परिसरातून हा साठा आणल्याची माहिती आरोपींनी प्राथमिक चौकशीमध्ये दिली होती. त्यामुळे भिवंडीतून कफ सिरफची तस्करी होत असल्याचे वेळोवेळी पोलीस कारवाईतून समोर आले आहे.

दरम्यान, कफ सिरपमध्ये कोडीन नावाचे द्रव्य असते. त्याचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास नशा चढते. नशेखोर ५० ते १०० मिलीची बाटली एका झटक्यात पितात. त्यामुळे काही तास ते नशेत असतात. हा परिणाम मेंदूच्या नर्व्हस सिस्टीमवर होऊन शरीरयष्टी कमी होणे, भूक न लागणे आदी परिणामही नशेखोरांवर होतात. त्यामुळे एमडी पावडरनंतर आता नशेड़ी कफ सिरपचा वापर नशा करण्यासाठी करत असल्याचे समोर येत आहे. मुंब्रा आणि भिवंडी सारख्या ठिकाणी अशा कफ सिरफ व झोपेच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. एमडीच्या उपद्रवानंतर आता शासनाने बंदी घातलेल्या कफ सिरफ़ आणि झोपेच्या गोळ्यांचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असून अशा औषधींची तस्करी व विक्री ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलीय.

पर्यायी औषधांचा देखील नशेसाठी वापर

ड्रग्स प्रकारात मोडणारे पदार्थ जसे की गांजा, चरस, एमडी आदी पदार्थांवर पोलिसांनी कडक वाच ठेवल्याने आता नशेडी इतर पदार्थांची नशा करण्याकडे वळली आहे. हे इतर पदार्थ म्हणजे शाई खोडण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाइटनर, डोकेदुखीत वापरण्यात येणारे बाम, झोपेच्या गोळ्या हे होय. व्हाइटनर व बाम खाण्याच्या पानाला लावून ते खाल्याने मोठी नशा होते. विषेश म्हणजे व्हाइटनर किंवा बामवर कुठल्याही प्रकारे बंदी नसल्याने नशेडींना हे पदार्थ सहज मिळतात. म्हणून कफ सिरफ, व्हाइटनर, बाम असे विविध पदार्थांचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. तसेच झोपेच्या गोळ्यांचा देखील नशेसाठी वापर होतो.

पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आयडिया

कोरोनाकाळात सर्वत्र नाकाबंदी असल्याने तस्करांना ड्रग्जची तस्करी करणे मुश्किल होऊन बसले होते. त्यामुळे नशेंडी समोर मात्र मोठी अडचण झाली होती. यावर उपाय म्हणून नशा करणाऱ्यांनी लॉकडाऊन काळात सुरू असलेल्या मेडिकलवरील औषधांचा साठी वापर सुरू केला होता. त्यात कफ सिरफचा समावेश होता. नशेखोर कफ सिरफची बॉटल घेऊन आपली तलफ भागवत होते. तसेच कफ सिरफ, झोपेच्या गोळ्या, डोकेदुखीवर वापरण्यात येणारे बाम आदी औषधी खरेदी करताना पोलीसांची कारवाई टाळता येते. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी देखील नशेडी पर्याय म्हणून कफ सिरपचा वापर करतात.

Back to top button