मुंब्रा अपघात प्रकरणी एमएमआरडीए-कंत्राटदारावर गुम्हा दाखल करा : जितेंद्र आव्हाड | पुढारी

मुंब्रा अपघात प्रकरणी एमएमआरडीए-कंत्राटदारावर गुम्हा दाखल करा : जितेंद्र आव्हाड

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुंब्रा बायपासवर झालेल्या अपघात प्रकरणी एमएमआरडीए आणि संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. एक वर्ष उड्डाणपूल सुरू होऊनही या पुलाचे काम का पूर्ण करण्यात आले नाही असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तर, या ठिकाणी संरक्षक भिंतही का उभारण्यात आली नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशाराही आव्हाड यांनी यावेळी दिला.

मुंब्रा बायपास येथे ट्रकखाली कोसळून एका सायकलस्वराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन भेट दिली. हा अपघात असला तरी उड्डाणपुलातील त्रुटींमुळे या अपघाताला त्यांनी एमएमआरडीए आणि संबंधीत कंत्राटदाराला जबाबदार धरले आहे. हा ब्रिज ओपनिंग करून वर्षभर झालं आहे. तरीही ब्रिजचे काम अर्धवट आहे. या ठिकाणी एक भिंत उभी करावी जेणेकरून अपघात टाळू शकतात. ती देखील कंत्राटदार उभी करू शकले नाही. अनेक वेळा लोकांनी तक्रार देखील केली असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

मुंब्रा परिसरात जे दोन उड्डाणपण बनले आहे ते उड्डाण पुल तसेच सर्विस रोड बांधण्यासाठी मी मागणी केली होती. सगळी जबाबदारी कंत्राटदार तसेच एमएमआरडीएचे अधिकाऱ्यांची असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी त्यानी केली. जर गुन्हा दाखल झाला नाही तर येत्या काही दिवसातच या मुंब्रा बायपास हायवे बंद करण्याबरोबरच पोलीस स्टेशनला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला.

मृताच्या नातेवाईकांना आव्हाडांकडून 1 लाखांची मदत

अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 1 लाखांची मदत जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केली आहे. तर इतर जखमींचा खर्च देखील आपण उचलणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले

Back to top button