सोलापुरात शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाची शक्यता | पुढारी

सोलापुरात शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाची शक्यता

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  नाट्यप्रेमी रसिक सोलापूरकरांसाठी गुड न्यूज आहे. शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सोलापुरात होण्याची शक्यता दिसून येत आहे. अ. भा. मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेने मुंबईत कलाभूमी रंगमंच येथे घेतलेल्या सर्वसाधारण सभेत आगामी नाट्य संमेलन सोलापूरला घेण्याविषयीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, यापूर्वी म्हणजे 2007 साली 88 अ. भा. मराठी नाट्यसंमेलन सोलापुरात खूप उत्साहात पार पडले होते. पार्क स्टेडियमवर पार पडलेल्या या संमेलनाचे उद्धाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले होते. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भूषवले होते.

मुंबईत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या उपनगरी शाखेचे अध्यक्ष तथा मुंबईच्या नाट्य परिषदचे कार्यकारी सदस्य विजय साळुंखे, प्रमुख कार्यवाह प्रशांत शिंगे, कोषाध्यक्ष कृष्णा हिरेमठ, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, डॉ. मीरा शेंडगे, उपस्थित होते. एक व्यक्ती-एक पद असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेले महेश निकंबे, शिवाजी उपरे, राजेश जाधव, श्रुती मोहोळकर यांना मंजुरी देण्यात आली. नरेंद्र गंभीरे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेसाठी सुशांत कुलकर्णी, अनुजा मोडक, राजासाहेब बागवान, आशुतोष नाटकर, किरण लोंढे आदींनी परिश्रम घेतले. कार्याध्यक्ष दिनेश शिंदे यांनी आभार मानले.

साळुंखेंची पन्नास हजारांची देणगी

नाट्यपरिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजयदादा साळुंखे यांनी अ. भा. मराठी नाट्य परिषद, उपनगरीय शाखेसाठी 50 हजार रुपयांची देणगी जाहीर केली.

Back to top button