सोलापूर: मकाई साखर कारखाना निवडणुकीसाठी चुरशीने ५७.९३ टक्के मतदान | पुढारी

सोलापूर: मकाई साखर कारखाना निवडणुकीसाठी चुरशीने ५७.९३ टक्के मतदान

करमाळा: पुढारी वृत्तसेवा : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी 9 जागेसाठी आज (दि. १६) 57. 93 टक्के चुरशीने मतदान झाले. आज सकाळी आठ वाजल्यापासून सर्वांच मतदान केंद्रावर मतदानाला सुरूवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 41 मतदान केंद्रावर 57.93 टक्के मतदान झाले. एकूण 16 हजार 864 मतदारांपैकी 9 हजार 706 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 8 हजार 64 पुरूष तर 1 हजार 642 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी अकरा वाजता 18.89 टक्के, दोन वाजता 37.10 टक्के व पाच वाजता 57.93 टक्के मतदान झाले होते. सर्वात जास्त मांगी केंद्रात 66.63 टक्के मतदान झाले. तर चिकलठाण केंद्रावर 44.57 टक्के सर्वात कमी मतदान झाले. त्यापाठोपाठ भिलारवडी येथे 55.72 टक्के, वांगी येथे 57.7 टक्के, पारेवाडी येथे 59.69 टक्के मतदान झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार जाधव तसेच सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे राबवली. निवडणुकीसाठी 246 कर्मचारी कार्यरत होते. मतमोजणी 18 जून रोजी सकाळी 8 वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या बहुउद्देशिय सभागृहात होणार आहे. पोलीस निरीक्षक जोतिराम गुजंवटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सत्ताधारी बागल गटाच्या दिगंबररावजी बागल मकाई पॅनल विरोधात प्रा. रामदास झोळ यांच्या मकाई परिवर्तन पॅनलने निवडणूक लढवली होती. बागल गटाने आधीच आठ जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. 9 जागेसाठी आज मतदान झाले आहे. 14 उमेदवार रिंगणात आहेत. विरोधातील चार उमेदवारांनी पाच जागा लढवल्या आहेत.

हेही वाचा 

Back to top button