APMC Election : सोलापूर, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला सहा महिन्याची मुदतवाढ | पुढारी

APMC Election : सोलापूर, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : अखेर सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला (APMC Election) मुदत वाढीचा आदेश शासनाने काढला आहे. गुरुवारी पणन विभागाच्या सहसंचालकांकडून याबाबतचा आदेश काढण्यात आला. या आदेशानुसार सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला सहा महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ देण्यासाठी निवडणुकीचा कालावधी हा पावसाळ्यात असल्याचे कारण दिले आहे.

सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला शासनाने सहा महिन्याची मुदत वाढ दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे २७ जानेवारी २०२४ पर्यंत हे संचालक मंडळ सत्तेत राहणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख तर बार्शीच्या बाजार समितीची सत्ता ही भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे आहे. राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत हे या बाजार समितीचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही बाजार समितीच्या संचालक मंडळांनी मुदतवाढ मिळावी यासाठी शासनाकडे मागणी केली होती. याबाबत शासनाने उपनिबंधक कार्यालयाकडून अहवाल मागवला होता.

जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अहवालाचा आधार घेत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. या माध्यमातून बाजार समिती व संचालक मंडळ मालामाल होत आहे. त्यामुळे हा उत्पन्नाचा आर्थिक स्तोत्र ताब्यात राहावा यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ‘ वजन ‘ वापरल्याची चर्चा आहे.

शासनाने आमच्या कामकाजाची दखल घेत आम्हाला मुदतवाढ दिलेली आहे शासनाच्या या निर्णयामुळे आम्ही समाधानी आहोत.
– श्रीशैल्य नरोळे, उपसभापती, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

Back to top button