पुणे-सोलापूर महामार्गावर घनश्याम दराडे यांच्या वाहनाला अपघात | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावर घनश्याम दराडे यांच्या वाहनाला अपघात

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात ‘छोटा नेता’ अशी ओळख असलेल्या घनश्याम दराडे यांच्या चारचाकी वाहनाला बुधवारी (दि.१४) सकाळी नऊच्या सुमारास अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत हा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनात त्यांचे आई-वडील व आणखी दोघेजण असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दराडे यांची आई किरकोळ जखमी झाली.

अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, घनश्याम दराडे यांचे आई-वडील व आणखी दोघेजण आज सकाळी पुणे-सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचनहून पुण्याच्या बाजूने निघाले होते. याचवेळी सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील फाट्यावर अचानक एक वाळूच्या डंपरने दराडे यांच्या चारचाकीला चालकाच्या उजव्या बाजूने जोराची ठोकर दिली. या अपघातात गाडीचे नुकसान झाले. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच घनश्याम दराडे घटनास्थळी दाखल झाले होते. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पालखी सोहळ्यासाठी रस्ते बंद असतानाही डंपर रस्त्यावर?

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी बुधवारी लोणी काळभोर मुक्कामी असल्याने शेकडो पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरच्या बाजूने येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. तरीही हा डंपर महामार्गावर कसा आला व अपघात कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा 

Back to top button