Priyanka Gandhi : मोदींनी दिली केवळ समस्यांची सौगात; प्रियंका गांधी यांची टीका | पुढारी

Priyanka Gandhi : मोदींनी दिली केवळ समस्यांची सौगात; प्रियंका गांधी यांची टीका

लातूर, पुढारी वृतसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला 70 वर्षाचा हिशेब मागतात तथापि त्यांनी दहा वर्षात काय केले? हे सांगणे टाळतात. दहा वर्षात त्यांनी महागाई, बेरोजगारीची अशा नानाविध समस्यांची सौगात जनतेला दिली आहे. जनतेपेक्षा नेता श्रेष्ठ असतो या अहंकारात ते वावरत आहेत. समस्येच्या जंजाळात सामान्य माणसाचा श्वास गुदमरून गेला आहे ही परिस्थिती दूर करणे आणि लोकशाही वाचवणे ही आजची गरज असून त्यासाठी काँग्रेसला साथ द्या असे आवहान काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वडेरा यांनी शनिवारी (दि.27) उदगीर येथे केले.

उदगीर येथे महाआघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ प्रियंका यांची सभा झाली. आ. अमित देशमुख आ.धीरज देशमुख , वैशालीताई देशमुख उमेदवार डॉ.काळगे आदिंसह अनेकांची उपस्थिती होती. रामराम लातुरकर म्हणत प्रियंका यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली.

त्या म्हणाल्या लोकशाहीचा आधार लोकच असतात व त्याच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्या लागतात याचाच विसर मोदी सरकारला पडला आहे. देशात सत्तर कोटी बेरोजगार आहेत. केंद्रात 30 लाख पदे रिक्त आहेत त्यासाठी शिक्षित तरुण आहेत परंतु नौकर भरती केली जात नाही.

अन्नदाता शेतकरी आज कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. अशावेळी त्याला आधार देण्याऐवजी अब्जोपती खरबोपतींना 16 लाख कोटींची कर्जमाफी मोदींनी दिली. कोवीड लस तयार करणार्यांनाही यांनी सोडले नाही. ईडीच्या माध्यमातून छापे टाकायचे अन नंतर देणग्या घेवून सोडून द्यायचे हे सारे आता समोर येत आहे.

पाच किलो मोफत धान्याच्या पलीकडे या सरकारने तुम्हाला काय दिले ? असा सवाल त्यांनी केला . केवळ टीव्हीच्या स्क्रीनवरच सब कुछ अच्छा है, हे दिसत आहे असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात पैशाच्या बळावर लोकप्रतिनिधींची खरेदी यांनी केली आणि तुम्ही निवडलेल्या सरकारला त्यांनी पाडले.

लोकशाहीमध्ये हा अपराध आहे. संधी मिळाली तर हे संविधान ही बदलतील असेही त्या म्हणाल्या. या देशात महिला सुरक्षित नाहीत, तरुणाला रोजगार अन मजुराला पुरेशी मजुरी नाही. शेतीसंबंधी प्रत्येक वस्तूवर त्यांनी जीएसटी लावली आहे. शेतीमालाला भाव नाही सोयाबीनची अवस्था तुम्ही पहातच आहात . धर्म आणि जातीच्या नावाचे राजकारण करून समाजाची ते दिशाभूल करीत आहेत निवडनुकीच्या पार्श्वभूमिवरची ही त्यांची नौटंकी वेळीच ओळखा व काँग्रेसला साथ द्या असे त्या म्हणाल्या.

देशात अनेक पंतप्रधान झाले. असे सांगत प्रियंका यांनी त्यांच्या परिवारातील पंतप्रधान झालेल्या व्यक्तीसह अटलबिहारी वाजपेई व डॉ. मनमोहन सिंग यांचा आदराने उल्लेख केला. त्यांनी या पदाची उंची वाढवली त्या म्हणाल्या तथापि नरेंद्र मोदी यांनी या पदाची उंची कमी केल्याची टिका त्यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button