आज बाळासाहेब ठाकरेंना किती दु:ख होत असेल : कोल्‍हापूरमधील सभेत PM मोदींची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका | पुढारी

आज बाळासाहेब ठाकरेंना किती दु:ख होत असेल : कोल्‍हापूरमधील सभेत PM मोदींची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे. आज ते काँग्रेससह इंडिया आघाडीच्या धोरणाला खांद्याला- खांदा लावून चालत आहेत. शिवरायांच्या भूमीमध्ये औरंगजेबाच्या कबरीला पाया पडणारे नेते पाहून आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना किती दु:ख होत असेल, अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. कोल्‍हापूरमध्‍ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थी सभेत ते बोलत होते.

भाषणाला सुरुवात मराठीतून…

तपोवन मैदानावरील जाहीर सभेतील भाषणाची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून केली. मी काशीचा खासदार करवीर काशीला आल्याचे माझे भाग्य आहे. जगात भारी आम्ही कोल्हापुरी, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची जबाबदारी कोल्हापूरकरांवर

बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले, काँग्रेस विकासात एनडीएची बरोबरी करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी तुष्टीकरण कऱण्यास सुरूवात केली असून त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा देशविरोधी अजेंडा आहे.यंदाची लोकसभा विकसित भारतासाठी आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची जबाबदारी कोल्हापूरकरांवर आहे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

कुणाच्यात हिंमत आहे मोदींचे पाय मागे ओढण्याची ?

कोल्हापुरला महाराष्ट्राचे फुटबॉल हब असे म्हटले जाते. तरुणामध्ये फुटबॉल लोकप्रिय आहे. विरोधकांनी तुष्टीकरणाच्या राजकारणाला सुरूवात केली आहे. काँग्रेसने ३७० कलम पुन्हा आणण्याची घोषणा केली आहे. परंतु, कुणाच्यात हिंमत आहे का ?, मोदींचे पाय मागे ओढण्याची, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.

नकली शिवसेना काँग्रेससोबत फिरत आहे

उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे. आज ते काँग्रेससह इंडिया आघाडीच्या धोरणाला खांद्याला- खांदा लावून चालत आहेत.नकली शिवसेना काँग्रेससोबत फिरत आहे. काँग्रेस आरक्षणासाठी कर्नाटक मॉडेल राबवित आहे. तिथल्या मुस्लिमांना ओबीसी करून टाकले आहे. काँग्रेसने नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे, असेही ते यावेळी म्‍हणाले.

हेही वाचा : 

 

Back to top button