सोलापूर : मोहोळ तालुक्यात वीज कोसळली, एक शेतकरी ठार | पुढारी

सोलापूर : मोहोळ तालुक्यात वीज कोसळली, एक शेतकरी ठार

मोहोळ; पुढारी वृत्तसेवा: परतीच्या पावसामुळे मोहोळ तालुक्यात शनिवारी रोजी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून जीवित हानी झाली आहे. यामध्ये नजीक पिंपरी येथील एक शेतकरी ठार तर दुसरा शेतकरी गंभीर जखमी झाला.

पोखरापूर येथे घराच्या दरवाज्यात वीज पडल्याने धक्का बसून एका व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी खिळा घुसला आहे. तर कोन्हेरी येथे वीज अंगावर पडल्याने एका शेतकऱ्यांची म्हैस जागीच ठार झाली. या तीन घटनांमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने मोहोळ तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडत असल्याने विजा पडण्याच्या घटनामध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे.

नजीक पिंपरी येथील शेतकरी जागीच ठार

शनिवार (दि. ९ ऑक्टोबर) रोजी नजीक पिंपरी येथील शेतकरी बाळू गोविंद सरवदे (वय ५२) व त्यांचा मोठा भाऊ प्रकाश गोविंद सरवदे (वय ५५) हे दोघे तांबोळे गावच्या हद्दीत शेतीची कामे करीत होते. दुपारी पावणेतीन वाजता पावसाला सुरुवात होऊन बाळू सरवदे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले तर प्रकाश सरवदे हे किरकोळ जखमी झाले.

लोखंडी खिळा डोक्यात लागल्याने एकजण जखमी

पोखरापूर येथील मारुती कडापा लेंगरे हे घराच्या दरवाज्यात थांबले होते. यावेळी त्यांच्यासमोर वीज पडल्याने धक्का बसून ते बाजूला पडले. यावेळी एक मोठा लोखंडी खिळा त्यांच्या डोक्यात खोलवर घुसल्याने ते गंभीर जखमी झाले.

घरातील सदस्यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, लोखंडी खिळा डोक्यात खोलवर रुतलेला असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवून देण्यात आले.

कोन्हेरी येथे म्हशीवर वीज कोसळली

कोन्हेरी येथे देखील वीज पडल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता जनार्दन माहिपती मुळे यांच्या शेतातील घरासमोरील जनावरांच्या गोठ्यातील म्हशीच्या अंगावर वीज पडल्याने ती जागीच ठार झाली. या दरम्यान तिन्ही घटनांची नोंद महसूल प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आलेली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button