सुखवद पूल खून प्रकरण : 'त्या' महिलेच्या खुनाचे गूढ उकलले - पुढारी

सुखवद पूल खून प्रकरण : 'त्या' महिलेच्या खुनाचे गूढ उकलले

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिंदखेडा तालुक्यातील सुखवद पुलाखाली आढळलेल्या महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. तिच्‍या प्रियकराने गळा दाबून खून केल्याचे तपासात स्‍पष्‍ट झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला संशय येताच या महिलेचे दुस-यांदा शवविच्छेदन केल्यानंतर हा खूनाचा प्रकार उघडकीस आला. पोलिस पथकाने खून करणा-या  युवकास सुरत शहरातून बेडया ठोकल्या आहेत.

शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीवरील सुखवद गावाजवळील पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिची सुरुवातीस ओळख पटली नव्हती. त्यामुळे तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यात मृत्यूचे कारण स्पष्टपणे लक्षात आले नसल्याने पोलिसांपुढे पेच निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत व सहायक निरीक्षक प्रकाश पाटील यांनी या भागात चौकशी सुरु केली.

चौकशीचे धागेदोरे सुरतपर्यंत

या भागातून एकही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नव्हती. त्यामुळे तिचा फोटो दाखवून ओळख पटवण्याचे काम सुरु असतानाच सुखवदच्या पुलावर गुजरात पासिंगची गाडीजवळ ही महिला एका युवकाबरोबर बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

क्लोरोफॉर्मने बेशुद्ध केल्‍यानंतर गळा आवळला

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सुरत येथे तपास सुरु केला. त्यांना या गुन्हयाची उकल करण्यात यश आले. मयत महिलेचे नाव मायाबाई संदीप पाटील असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेची ओळख मनोज उर्फ मनोहर पाटील याच्याबरोबर होती. त्यानेच या महिलेला क्लोरोफार्मने बेशुध्द  केले. यानंतर तिचा गळा दाबल्याची तपासात स्‍पष्‍ट झाले.  क्लोरोफार्मची माहीती पुढे आल्याने मयत महिलेचे फेर शवविच्छेदन करण्यात आले.

तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; नराधम तरुणाला अटक

यात तिचा गळा दाबल्याने खून झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. पोलिस पथकाने खून करणा-या  मनोज उर्फ मनोहर पाटील यास सुरत शहरातून बेडया ठोकल्या आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button