पुणे – नाशिक महामार्गावरील मोशी, चांडोली टोल नाके अखेर बंद | पुढारी

पुणे - नाशिक महामार्गावरील मोशी, चांडोली टोल नाके अखेर बंद

मोशी : पुढारी वृत्तसेवा

पुणे – नाशिक महामार्गावर टोल वसुली करणारे चांडोली व मोशी येथील टोल नाके अखेर बंद करण्यात आले आहेत. मुदत संपल्याने येथील वसुली बंद करण्यात आली आहे.

तब्बल सोळा वर्षे आठ महिने पंचावन्न दिवस एवढा काळ हे टोल नाके होते. नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतच्या तीस किलोमीटर अंतरादरम्यान दोन टोल नाके उभारण्यात आले होते. ते बंद झाल्याने नाशिक फाटा ते खेड पर्यंतचा रस्ता आता टोलमुक्त झाला आहे.

शुक्रवार (दि.८) रोजी रात्री बारा वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोशी व चांडोली येथील टोल वसुली बंद करण्यात आली. नाक्यावर बसविण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक वसुली बूथ देखील बंद करण्यात आले आहेत. संबंधित टोल नाके बंद करण्यात आले असून हस्तांतरण प्रक्रिया शनिवार, रविवार सुट्टी असल्याने सोमवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतचा रस्ता गॅजेटनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती मोशी टोल नाका प्रशासनाकडून देण्यात आली.

टोल नाके बंद झाल्याचे वाहनधारकांना समाधान

टोल वसुली बंद झाल्याने वाहन चालक समाधान व्यक्त करत आहेत. वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या सदर मार्गावर यामुळे काहीसा दिलासा मिळणार असल्याची भावना वाहन चालकांनी व्यक्त केली. चांडोली, मोशी येथील टोल नाक्यावर स्थानिक असून देखील अनेकदा टोल भरावा लागलेल्या त्रस्त वाहन चालकांनी टोल वसुली बंद झाल्याने आनंद व्यक्त केला आहे.

मात्र जाणकारांनी सदर रस्ता यानंतर सुस्थितीत ठेवला जाईल का, अशी काळजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील इतर रस्त्यांची अवस्था पाहता या रस्त्याची किती देखभाल ठेवली जाईल अशी काळजी व्यक्त केली आहे. यामुळे वाहतूक कोंडी बरोबरच रस्त्याची दुरवस्था देखील वाहनचालकांना सहन करावा लागण्याची चिंता व्यक्त होत आहे.

सोळा वर्षे आठ महिने पंचावन्न दिवस होते टोल नाके

पुणे – नाशिक महामार्गावर नाशिक फाटा, कासारवाडी ते चांडोली, राजगुरुनगर पर्यंतच्या तीस किलोमीटर रस्त्यावर १५ डिसेंबर २००५ पासून आयआरबी कंपनीकडून टोल वसुली सुरू झाली. वसुलीची मुदत १४ सप्टेंबर २०२१ रोजी संपली त्यानंतर कंपनीला लॉकडाऊन काळात वसूली करता न आल्याने २५ दिवस कालावधी वाढ देण्यात आली.अखेर मुदत वाढ संपल्या नंतर ८ ऑक्टोबर २०२१ रोजी मोशी व चांडोली टोल नाके बंद करण्यात आले, अशी माहिती टोल नाका प्रशासनाकडून देण्यात आली.

Back to top button