सोलापूर : जिल्ह्यात साडेसात लाख घरांवर फडकणार तिरंगा | पुढारी

सोलापूर : जिल्ह्यात साडेसात लाख घरांवर फडकणार तिरंगा

सोलापूर; पुढारी वृत्‍तसेवा : शासन निर्देशानुसार आजादी का अमृत महोत्सवांतर्गत सोलापूर जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानुसार जिल्ह्यातील साडेसात लाख घरांवर 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत तिरंगा फडविण्याचे नियोजन करण्यात येणार आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. या उपक्रमात जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आढावा बैठक पार पडली. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, महापालिकेचे सहायक आयुक्‍त पुष्पगंधा भगत, सहायक पोलिस आयुक्‍त दीपक आर्वे, पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अनिल विपत, शिक्षण विस्तार अधिकारी सुहास गुरव तसेच अन्य संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शंभरकर म्हणाले, सर्व शासकीय तसेच निमशासकीय विभागप्रमुख व खासगी आस्थापनांनी आपापल्या स्तरावर हर घर झेंडा हा उपक्रम दिनांक 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी प्रयत्न करावेत. नागरिकांना याबाबत प्रोत्साहित करावे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 75 फूट उंच राष्ट्रध्वज उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ते नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले आहे.
या उपक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेने ग्रीन बेल्ट स्वातंत्र्य बागेची निर्मिती करण्यासाठी त्यांच्या स्तरावरून योग्य ते नियोजन करावे. तसेच महापालिकेच्या हद्दीतील सर्व घरांची माहिती घेऊन प्रत्येक नागरिकापर्यंत हा उपक्रम पोहोचण्यासाठी दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी आजादी का अमृत महोत्सव या मोहिमेचे जिल्हास्तरीय समन्वयक उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख यांनी हर घर झेंडा या उपक्रमाबाबत माहिती बैठकीत सादर केली. तसेच प्रत्येक विभागाने करावयाच्या कामांची माहिती देऊन परस्परांमध्ये समन्वय ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

Back to top button