सोलापूर ; सदाशिव पवार,(टेंभुर्णी) पुणे-सोलापूर महामार्गावर शिराळ (टें) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीस पाठीमागून भीषण धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना (गुरुवार) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हॉटेल जयमल्हारच्या समोर घडली आहे. या अपघातातील मृत तिघेजण मोहोळ तालुक्यातील असून यात मावस बहीण-भाऊ व जावेचा समावेश आहे. या अपघाताने तीन कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे.
महादेव रमेश ताकमोगे (वय २२,रा.डिकसळ,ता.मोहोळ) हल्ली रा.टेंभुर्णी,एमआयडीसी,महानंदा विकास पवार (वय ४५) व सुषमा प्रकाश पवार (वय ३८) दोघी रा.देगाव (वाळूज) ता.मोहोळ अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील महानंदा व सुषमा या दोघी जावा-जावा रा.देगाव (वा) येथून भिमानगर येथे घरगुती कार्यक्रमानिमित्त नातेवाईकांकडे गुरुवारी दुपारी गेल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री महानंदा यांचा भाऊ महादेव ताकमोगे हा त्यांना दुचाकीवर (क्र-एम.एच-४५-जे-८१०६) टेंभुर्णीकडे घेऊन येत होता. ते माढा तालुक्यातील शिराळ (टें) हद्दीतील हॉटेल जयमल्हारच्या समोर आले असता त्यांना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात महादेव रमेश ताकमोगे व सुषमा पवार हे दोघे जागीच ठार झाले तर महानंदा याना टेंभुर्णी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले.
यावेळी पोलीस निरीक्षक दीपक पाटील,पोसई स्वाती सुरवसे यांनी अपघातस्थळी घाव घेऊन पहाणी केली. महादेव रमेश ताकमोगे (वय-२२) रा.मुळगाव डिकसळ,हल्ली टेंभुर्णी एमआयडीसी येथे हॉटेल चालवून वृद्ध आई-वडील यांना आधार देत होता. बहीण विवाह होऊन गेल्यानंतर आई-वडील यांचा तो एकमेव आधार होता. तो अविवाहित होता. त्याचा नुकताच साखरपुडा झाला होता. तोच या अपघातात मृत झाल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा :