एमआयडीसी कंपन्यांची वेळोवेळी तपासणी आवश्यक : केंद्रीय मंत्री रामदास आठवले | पुढारी

एमआयडीसी कंपन्यांची वेळोवेळी तपासणी आवश्यक : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसीमधील कंपन्यांची फॅक्टरी इन्स्पेक्टरने वेळोवेळी पाहणी करायला हवी. ज्या कंपन्यांत अवैध व्यवसाय आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास तातडीने ते थांबवणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याचे निदर्शनास येत असून त्यामुळे असे अपघात वारंवार घडत आहेत. त्यात सामान्य नागरिकांचा नाहक बळी जात असून त्यात दोषी असणाऱ्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमधील मे. अमुदान केमीकल्स कंपनीमध्ये गुरूवारी झालेल्या रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोटाच्या दुर्घटनास्थळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यानंतर आठवले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या दुर्घटनेत ज्यांचा बळी गेला त्यांच्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.

रिऍक्टर असेल अथवा बॉयलर याचीही वेळोवेळी तांत्रिक तपासणी व्हायला हवी. तसा योग्यतेचा अहवाल असायला हवा. त्यामुळे जे झाले ते दुर्देवी होते. अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे येऊन ज्या घोषणा केल्या, त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्हीही पाठपुरावा करू, त्यांना सहकार्य करू असेही मंत्री आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.

Back to top button