पक्षीप्रेमी सुखावले : संकटग्रस्त माळढोकचे सोलापुरात दर्शन; रानडुक्करांच्या संख्येत वाढ | पुढारी

पक्षीप्रेमी सुखावले : संकटग्रस्त माळढोकचे सोलापुरात दर्शन; रानडुक्करांच्या संख्येत वाढ

उत्तर सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक पक्षी अभयारण्यात वन्यजीव प्राणी व पक्षी गणनेत यंदा दुर्मिळ माळढोक (मादी) पक्ष्याने गंगेवाडी शिवारात दर्शन दिल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे निसर्गप्रेमी, पक्षीमित्र व पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बुद्ध पौर्णिमानिमित्त आज (दि.२३) सन २०२४-२५ ची वन्यजीव प्राणी गणना करण्यात आली. बुधवारी (दि.२२) ते गुरूवारी (दि.२३) पर्यंत नान्नज माळढोक पक्षी अभयारण्य अंतर्गत वडाळा, मार्डी, कारंबा, गंगेवाडी, हिरज, नरोटेवाडी व इतर गावातील २५ पाणवट्यावर वन्यजीव प्राणी गणना पार पडली.

यंदा झालेल्या वन्यजीव प्राणी गणनेत काळवीट, खोकडे, रानडुक्कर, रानमांजर, नीलगाय, कोल्हा प्राण्याची संख्या वाढली असून लांडगा, ससा, मुंगूस, सायाळ, घोरपड यांची संख्या घटली आहे. तर यंदा प्रथमच कुदळ्या २१ पक्षी आढळले असून ६१ मोर पक्षी दिसले आहेत. या गणनेसाठी अभयारण्यासह पाणवठ्याच्या परिसरात ८ मचाण (झोपडी) उभारण्यात आले होते. तर १४ वाँच टाँवरचाही गणने करिता उपयोग करण्यात आला होता. कॅमेऱ्यांसह दुर्बीणद्वारे वन कर्मचारी व पक्षीप्रेमींनी वन्यजीव गणना केली. यावेळी नान्नज अभयारण्यतील ३० वन अधिकारी व वन कर्मचारी उपस्थित होते. तर त्यांच्या मदतीला पुण्यातील ६ निसर्गप्रेमी, सोलापुरातील ९ तर हुबळी (कर्नाटक) १ निसर्गप्रेमीनी हजेरी लावली.

अनेक प्राणी व पक्ष्यांचे शांत वातावरणात पाणवठ्यावर पाणी पितानाचे दृश्य वन कर्मचारी व निसर्गप्रेमींनी कॅमेऱ्यात टिपले आहेत. उपसंरक्षक वन्यजीव पुणे तुषार चव्हाण, उपविभागीय वनाधिकारी स्नेहल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक किशोरकुमार येळ्ळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी शुभांगी जावळे, वनपाल जी. डी. दाभाडे,संतोष मुंडे, वनरक्षक अशोक फडतरे, विवेकानंद विभुते, सुनील थोरात, ललिता बडे, सत्यशिला कांबळे, सहाय्यक वनरक्षक किशोर कुमार इरळे,चंद्रकांत होनमोरे, भागवत मस्के व इतरही वनाधिकारी कर्मचारी निसर्गप्रेमी उपस्थित होते

प्राणी-पक्षी संख्या

माळढोक १( मादी) , काळवीट ३६२ , लांडगा – ८, ससा १८, मुंगूस ५, खोकडे १३ रानडुक्कर २४९, रानमांजर ६, सायाळ १, घोरपड २, कोल्हा ४, नीलगाय ६, कुदळ्या २१, मोर ६१

हेही वाचा :

Back to top button