पंढरपूर : रामनवमीनिमित्त विठ्ठल मंदिरात सफरचंदांची आरास | पुढारी

पंढरपूर : रामनवमीनिमित्त विठ्ठल मंदिरात सफरचंदांची आरास

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : रामनवमीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यात व श्री विठ्ठल चौखांबी येथे 5 हजार सफरचंदांची व फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांतून ही मनमोहक आरास पाहून समाधान व्यक्‍त होत होते.

पुण्यातील भरत रामचंद्र यादव या विठ्ठल भक्ताने श्रींच्या गाभार्‍यात व मंदिरात सफरचंदांची व शेवंती (पांढरी, पिवळी), दवना या पाना-फुलांची आरास करुन सेवा बजावली. तर, ताम्हाणे, शेरे, नाईक, शितोळे फ्लॉवर्स मर्चंट, पुणे यांनी गाभार्‍यात व मंदिरात सुंदर आरास साकारण्याचे काम केले.

श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने रुढी व परंपरेनुसार रामनवमी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विठ्ठलास पांढर्‍या रंगाचा पोशाख (अंगी, धोतर व पागोटे) परिधान करण्यात आला होता. दुपारी 12 वा. सुंठवडा दाखवण्यात आला. श्रींच्या अंगावरती गुलाल उधळण्यात आला. रामनवमीनिमित्त परंपरेनुसार श्री विठ्ठल सभामंडप येथे श्री विठ्ठल महाराज देहूकर यांच्या फडामार्फत सकाळी 10 ते 12 या वेळेत राम जन्माचे कीर्तन करण्यात आले. कीर्तनानंतर भाविकांना सुंठवडा देण्यात आला.

चैत्री यात्रा एकादशी उद्यावर आली आहे. यामुळे या यात्रेला मोठ्या संख्येने भाविक पंढरीत श्रींच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. श्रींच्या दर्शनाकरिता पंढरपूर मध्ये आलेल्या भाविकांना मंदिरात व गाभार्‍यात करण्यात आलेली मनमोहक आरास पाहून काश्मीर अवतरल्याचा भास होत आहे. मंदिर समितीच्या संकेतस्थळावरुनही घरबसल्या भाविकांना सुंदर आरासीचे दर्शन मिळत आहे.

Back to top button