विरोधकांनी कांदा प्रश्नी नेहमीच राजकारण केले : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

विरोधकांनी कांदा प्रश्नी नेहमीच राजकारण केले : उपमुख्यमंत्री फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर विरोधकांनी नेहमीच राजकारण केले. मात्र, कांद्याचे उत्पादन कितीनिर्यात किती त्यानुसार केंद्र सरकार वेळोवेळी योग्य धोरण स्वीकारत असते. आज केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घेतली या निर्णयाचे मनापासून आभार मानतो. आम्ही सतत या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आले असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना केले.

केंद्र सरकारने कांदा निर्याती संदर्भातील बंदी उठविली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आम्ही सतत या संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. वारंवार मागणी केली, विनंती केली ती मागणी अखेर केंद्र सरकारने मान्य केली मला याचा खूप आनंद आहे.

या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल. शेवटी या संदर्भात दोन्ही बाजू असतात कांदा भरपूर उत्पादन झाले असताना निर्यात झाली तर, मग दुप्पट तिप्पट किमतीत कांदा बाहेरून आयात करावा लागतो. केंद्र सरकार या संदर्भात वेळोवेळी निर्णय घेत असते. आता केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला.

केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांचे, कांदा उत्पादकांचे, सर्वसामान्यांचे हित पाहते हेच या निर्णयातून स्पष्ट झाले. मोदी सरकारने एक चांगला निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा यामुळे मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Back to top button