सातारा : वीज निर्मितीच्या पाणीसाठ्याची चिंता मिटली; कोयना धरणात अपेक्षित पाणीसाठा | पुढारी

सातारा : वीज निर्मितीच्या पाणीसाठ्याची चिंता मिटली; कोयना धरणात अपेक्षित पाणीसाठा

पाटण : पुढारी वृत्तसेवा 1 जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षात अपुर्‍या पावसामुळे सुरूवातीला धरणाच्या पाण्यावर अवलंबून जलविद्युत निर्मितीला मर्यादा आल्या होत्या. आता धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्यानंतर अपेक्षित वीजनिर्मिती सुरू आहे. मध्यंतरची तूट भरून काढत कोयनेच्या चार प्रकल्पातून आत्तापर्यंत 663 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली असून गतवर्षीच्या तुलनेत 37.142 दशलक्ष युनिट जादा वीज निर्मिती झाली आहे.

सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता पारंपरिक लवादाच्या आरक्षणासाठी यात कोणतीही अडचण नाही. अजूनही पावसाचा कालावधी बाकी असल्याने त्याकाळात येणारा अधिकचा पाणीसाठा हा गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी आरक्षीत कोट्यापेक्षा अतिरिक्त पाणीवापरासाठी फायदेशीर ठरेल असेच नैसर्गिक व तांत्रिक चित्र पहायला मिळत आहे. यावर्षी जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळी हंगाम व कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षारंभाला अपेक्षित पाऊस नसल्याने सिंचनापेक्षाही वीजनिर्मिती बाबत सार्वत्रिक चिंता वाटत होती. जुलै, ऑगस्टमध्ये अपेक्षित पाऊस व सिंचन व वीजनिर्मितीसाठी मुबलक पाणीसाठा झाल्यानंतर सार्वत्रिक चिंता मिटली आहे.

एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षात 3 सप्टेंबरपर्यंत चार वीजनिर्मिती प्रकल्पातून 663.186 दशलक्ष युनिट
वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत काहीसा पाणीवापर ज्यादा झाला असून त्यातून 37.142 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे. उर्वरित नऊ महिन्यांसाठी पाणीवाटप लवादाचा 54.02 टीएमसी आरक्षीत पाणी कोटा शिल्लक असल्याने आगामी काळात सुरळीत व अखंडीत वीजनिर्मिती शक्य असल्याचे स्पष्ट आहे.

पूर्वेकडे सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. आत्तापर्यंत सिंचन 4.26 व पूरकाळात 4.98 अशा एकूण 9.24 टीएमसी पाण्यावर 35.403 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचन व पूरकाळात सोडलेल्या 7.39 टीएमसी पाण्यावर 33.588 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 1.85 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने परिणामी 1.815 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे. चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता यावर्षी एकूण 22.72 टीएमसी पाण्यावर 663.186 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी 19.89 टीएमसी पाण्यावर 626.044 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण 2.83 टिएमसी पाणीवापर ज्यादा व 37.142 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे.

पश्चिम वीजनिर्मितीसाठी वर्षभरात 67.50 टीएमसी पाणी लवादाचा आरक्षित कोटा आहे. गतवर्षी अतिरिक्त पाणीवापर झाल्याने ऐन उन्हाळ्यातील संकट लक्षात घेऊन शासनाने पश्चिमेला अतिरिक्त 15 टीएमसी वापरायला परवानगी दिली होती. धरण निर्मितीनंतर पहिल्यांदाच गतवर्षी 82.64 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरले. गेल्या काही वर्षात सिंचनासाठी सरासरी 35 टीएमसी पाणी पाण्याची गरज भासते सुदैवाने गतवर्षी 21.70 टीएमसी मध्येच सिंचनाची गरज भागल्याने त्याचा अतिरिक्त वीजनिर्मितीसाठी फायदा झाला अन्यथा पश्चिमेला अतिरिक्त पाणी वापरासाठी परवानगी देवूनही अपुर्‍या पाण्याअभावी वीजनिर्मिती ठप्प झाली असती. एकूणच पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी पाणी वाटप लवादाचा आरक्षित 67.50 टीएमटी पैकी उर्वरित नऊ महिन्यांसाठी 54.02 टीएमसी आरक्षित पाणी शिल्लक असल्याने यावर आगामी काळात सुरळीत वीजनिर्मिती शक्य आहे.

  • कोयना 663 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती
  • पूर्व, पश्चिम प्रकल्पांसाठी 22.72 टीएमसी पाणीवापर
  • पश्‍चिम वीजनिर्मिती आरक्षित 54.02 टीएमसी कोटा शिल्लक
  • आगामी काळातील पाण्याची चिंताही मिटली

35.327 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती

आत्तापर्यंत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 13.48 टीएमसी पाण्यावर 627.783 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी आत्तापर्यंत 12.50 टीएमसी वर 592.456 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी पश्चिमेकडे 0.98 टीएमसी पाणीवापर ज्यादा झाल्याने परिणामी 35.327 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती ज्यादा झाली आहे.

हेही वाचा

Back to top button