महापालिका निवडणुका भाजप-शिंदे गट एकत्र लढविणार; फडणवीस यांची घोषणा | पुढारी

महापालिका निवडणुका भाजप-शिंदे गट एकत्र लढविणार; फडणवीस यांची घोषणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली.

भाजपने केवळ मिशन बारामती हाती घेतलेले नाही. आमचे मिशन महाराष्ट्र आहे. आम्ही राज्यातील सर्व निवडणुका एकत्र लढवू आणि जिंकू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. कुठलीही निवडणूक लढवित असताना ती आपल्या आयुष्यातील शेवटचीच निवडणूक आहे असे समजून ती लढविली पाहिजे, असे वक्तव्य आपण केले होते. ते केवळ मुंबई महापालिकेच्या वडणुकीपुरते मर्यादीत नव्हते तर सर्वच निवडणुकांसाठी होते, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेला शह देण्याचा हा भाजपचा दुसरा प्रयत्न मानला जात आहे. अमित शहा यांनी कालच्या मुंबई दौर्‍यात मुंबई महापालिका काबिज करण्यासाठीचा कानमंत्र पदाधिकार्‍यांना दिला आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे सह अनेक महापालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. त्याच्या तयारीला भाजपने आतापासून सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या ताब्यातून ही महापालिका मिळविण्यासाठी भाजपने शिंदे गटाबरोबरच निवडणुका लढविण्याचे ठरविले आहे. शिवाय मनसेलाही बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Back to top button